पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

त्यांचा सांभाळ करेल, असे आश्वासन त्यामागे होतं. पण लोक आपण टाकलेलं कळू नये म्हणून रात्री-अपरात्री यायचे...घंटाही नाही वाजवायचे...रात्रभर थंडीत कुडकुडलेलं बाळ सकाळी मेलेलं मिळायचं.
 मग ही प्रथा बंद करून कुमारी मातांनाच प्रवेश सुरू केला. दरम्यान १८७६-७७ मध्ये पंढरपूर भागात मोठा दुष्काळ पडला. अन्न पाण्याविना मोठी मनुष्यहानी झाली. अनेक मुलं पोरकी झाली. तत्कालीन ब्रिटिश सरकारने 'गोपाळपूर दुष्काळ निवारण समिती' स्थापून तिच्यामार्फत पोरकी मुलं संस्थेकडे सांभाळायला दिली. त्यांना धंदेशिक्षण देऊन स्वावलंबी करण्यासाठी ‘रॉबर्टसून स्कूल ऑफ इंडस्ट्री'ची स्थापना करण्यात आली. (ही शाळा उद्योगशाळा म्हणून प्रसिद्ध होती. नंतर ती नगरपरिषदेकडे चालवायला दिली. पंढरपूरचे आजचे लोकमान्य हायस्कूल ते हेच.)
 सन १८८१ ला लालशंकर त्रिवेदी यांची पंढरपूरहून बदली झाली. जाण्यापूर्वी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह, अनाथ बालकाश्रम व उद्योग शाळा या तिन्ही संस्था मुंबई प्रार्थना समाजाच्या हवाली केल्या आणि ते बदलीच्या जागी रुजू झाले. त्या क्षणापासून मुंबई प्रार्थना समाज आज अखेर त्या संस्थेचा सांभाळ करत आहे.
 स्थापनेपासूनच्या गेल्या १३६ वर्षांत या संस्थेनं ऊन-पावसाचे दिवस अनुभवले. प्रारंभीच्या १०० वर्षांच्या प्रवासात संस्थेस सर्वश्री रघुनाथराव करकरे, जी. व्ही. वीरकर, केरो रावजी भोसले (सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते), एल.बी.वैद्य, के. आर. शेवडे, व्ही. पी. आरोसकर, एस. एस. साळवी, बाबासाहेब जव्हेरी, रमाकांत तांबोळी यांच्यासारखे सेवाभावी अधीक्षक मिळाले व संस्था उत्कर्षापर्यंत पोहोचली. प्रारंभीच्या काळात संस्थेस सर्वश्री शेठ चतुर्भुज मोरारजी, तुकाराम तात्या, रमाबाई नवरंगे, रामचंद्र लालजी, भागोजी कीर प्रभृती मान्यवरांनी उदार हस्ते देणग्या दिल्या. त्या हजारो रुपयांच्या. त्यातून संस्थेस राजप्रासादसदृश वास्तू लाभली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुशिल्पी ज. ग. बोधेनी ती उभारली. संस्थेस लालशंकर उमियाशंकर त्रिवेदी या संस्थापकांप्रमाणेच वासुदेव बाबाजी नवरंगे (आज यांच्याच नावाने ही संस्था ओळखली जाते), सर नारायण चंदावरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, डॉ. काशिबाई नवरंगे, सर विठ्ठल नारायण चंदावरकर, द्वारकानाथ वैद्य प्रभृती मान्यवरांचे नेतृत्व व मार्गदर्शन लाभलं. त्यामुळे ही संस्था महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रातील राष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्था बनली. ही संस्था पाहून लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर,

निराळं जग निराळी माणसं/४३