पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिरावलेलं माणूसपण बहाल करणारं घर : बालकाश्रम

 ही गोष्ट आहे १३६ वर्षांपूर्वीची. १८७५ सालची. लालशंकर उमियाशंकर त्रिवेदी नावाचे न्यायाधीश पंढरपूरच्या न्यायालयाचे उपन्यायाधीश (सब जज्ज) होते. ते अत्यंत कनवाळू व संवेदनशील असल्याने परिचित त्यांना 'देव मुन्सफ' म्हणत. अहमदाबादला जन्मलेले, प्रतिकूल परिस्थितीत शिकलेले लालशंकर त्रिवेदी न्यायाधीश होऊन पंढरपुरी गेले, तेव्हा रोज चंद्रभागेच्या वाळवंटी फिरायला जात. एके दिवशी सायंकाळी अंधारून आलेलं असताना फिरत पुढे जाताना ठेच लागली. पाहतात तो पायाशी कपड्यात गुंडाळलेलं बाळ होतं. प्रार्थना समाजाच्या समाजसेवेचा प्रभाव असलेल्या निपुत्रिक लालशंकर त्रिवेदींनी ते बाळ घरी आणलं. सोबत पत्नी देवकीबेन होत्याच. त्यांनी आपल्या घरी बाळाला सांभाळलं.
 त्यांच्या लक्षात आलं की, पंढरपुर तीर्थक्षेत्र असल्याने अनेक लोक येथे येऊन पापक्षालन करतात. म्हणजे अनाथ अर्भकांना देवाचरणी सोडतात; पण ते सोडायचे प्रकार अनेक व अघोरी होते. वाळवंट, नदी, देऊळ, रेल्वे, बस स्टॅण्ड, अन् कधी कधी तर गटार, संडासातही! हे सारं पाहून लालशंकर त्रिवेदींनी या मुलांच्या रक्षणासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. ते वर्ष होतं १८७५. तत्पूर्वी अशाच संवेदनेने महात्मा फुले यांनी १८६३ मध्ये पुण्याच्या गंज पेठेत असेल बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं होतं.
 पंढरपूरच्या बालहत्या प्रतिबंधक गृहाने आपल्या इमारतीसमोर एक पाळणा ठेवला होता. त्याला घंटा बांधली होती. ज्यांनी अशी अनाथ, अनौरस अर्भकं सोडायची आहेत त्यांनी ती वरीलप्रमाणे अन्यत्र न टाकता इथं द्यावी... संस्था

निराळं जग निराळी माणसं/४२