पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होत राहिली. पुढे मी बालकल्याण संकुलात कार्य करू लागलो अन् एक महिला आधारगृह सुरू केलं. तिथल्या महिलांना स्वयंसिद्धा करण्यासाठी टाटा ट्रस्टनं आम्हाला मोठं साहाय्य केलं होतं. त्यावेळी कांचनताई आमच्या मदतीला आल्या होत्या. तेव्हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची, कार्यकौशल्याची जवळून प्रचिती आली. कांचनताई स्पष्टवक्त्या. शब्दांच्या पक्क्या. तंत्रावर 'कमांड' म्हणून समाजात 'डिमांड' त्या कुणाच्या याचक होत नाहीत. हक्काची लढाई व्यक्तिगत जीवनात पण लावून धरल्यानं त्यांच्या जीवनाला एक शिस्त आहे. ती शिस्त त्या एन.सी.सी. अधिकारी असल्यानं उतरली असावी. नेटकेपण हे त्यांचं वैशिष्ट्य. पसारा एवढा; पण त्या मोबाईल वापरत नाहीत, का तर बोलण्यात वेळ खूप जातो. (त्या राष्ट्रपती होतील तर मोबाईल कंपन्यांवर संक्रांत आल्याशिवाय राहणार नाही!) हे असतं त्यांच्या कर्मठशीलतेचं प्रतीक. त्या स्वत: एकही प्रशिक्षण देत नाहीत. रचना उभारणं, योजना करणं, तंत्र विकसित करणं यावर त्यांचा भर असतो. प्रशिक्षणं त्यांची दिवसाची असतात. पण खरं प्रशिक्षण असतं कांचनताईंचा त्यांच्याशी झालेला पहिला संवाद, पहिलं समुपदेशन. त्यात त्या महिला भगिनी न्यूनगंड कायमचा दूर करतात. बोला, वाचा, लिहा, करा, मिळवा अशी पंचसूत्री देऊन त्या महिलांचा कायाकल्प घडवून आणतात. कांचनताईंनी उभारलेल्या महिला उद्योजक झाल्या. अशा उद्योजक की आयकर खात्यासही त्यांची दखल घ्यावीशी वाटली (रेड टाकून किंवा असेसमेंटला केस काढून), हे असतं यश. युती शासनाच्या वेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. ते स्वयंसिद्धाच्या एका कार्यक्रमात आले होते. काम पाहून इतके प्रभावित झाले की, त्यांनी जाहीर भाषणात त्यांना शिवसेनेत यायचं आवाहन, आमदार, मंत्रिपदाचं आमिष दाखवलं होतं... कांचनताईंनी ते स्पष्ट व ठामपणे जाहीररित्या नाकारलं! कामानं त्या शेफारल्या नाहीत. आपणास अजून बरंच करायचं आहे. आपण एक शतांश महिलांपर्यंत पोहोचू शकलो नसल्याची त्यांना जाण, खंत आहे. पुढील वर्षीच त्यांची षष्ट्यब्दी होईल. आता त्यांनी आपले कार्यानुभव लिहायला हवेत. ते दूरवरच्या सर्व भगिनींना स्वयंसिद्धा बनवतील. माणूस प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायचा तर अनुभव कथनास पर्याय नाही.

•••

निराळं जग निराळी माणसं/४१