पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुविधा, यंत्रणा, तरतूद न केल्याचाच ढळढळीत पुरावा! देणगीदारांवर तर किती अवलंबून राहायचं! मग फिरतं उपहारगृह, केटरिंग ऑर्डर, साधन विक्री सर्व करून पण सारं 'ऊंट के मुँह में जीरा' गरज लाखातली. मिळकत शंभरातली. मग ‘हेल्पर्स' नी गॅस एजन्सी, पतसंस्था, वस्तुविक्रीचे प्रयोगही केले. धडपड एकच. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचं! हे सोपं नव्हतं. पण 'असाध्य ते साध्य करिता सायास', 'स्काय इज द लिमिट' असं नसीमा हुरजूकांबरोबर रजनी करकरे, पी.डी.देशपांडे, मनोहर देशभ्रतार यांच्या बरोबर नसीमादीदींचे भाऊ बहिणी (अजीजभाई, आयाजभाई, कौसर दांपत्य) सर्व या अपंग स्वराज्य निर्मिती आंदोलनात तन, मन, धनासह सक्रिय झाले. प्रत्येकानं कामं वाटून घेतली. ध्येय एकच. अपंगांना काही कमी पडू द्यायचं नाही. आणि खरंच आज जो कोणी 'हेल्पर्स' नावाच्या या कल्पवृक्षाच्या छायेत येतो तो स्वाधार होतो.
 परवा याच 'हेल्पर्स'नं चालवलेली 'स्वप्ननगरी' मी पाहिली नि मला माझ्या धडधाकटपणाची लाजच नाही. तर शरमही वाटली. माझं ते वाटणं म्हणजे तुमच्या माझ्या सारख्यांचा साऱ्या धडधाकट माणसांचा उघडउघड पराभव होता. त्या दिवशी अपंगांना बक्षिसं द्यायची होती. ती मी दिली नाहीत. नसीमदीदींनी अपंगांपुढे बोलायला (मार्गदर्शन करायला) सांगितलं; पण मी बोललो नाही. त्यांच्या अभिप्रायवहीत मी अभिप्राय लिहायचं नाकारलं. हा उद्धटपणा नव्हता, ती होती माझ्या मध्यमवर्गीय निष्क्रियतेची कबुली! मी काय पाहिलं तिथे? एक माणगावकर नावाचं उदार कुटुंब. त्यांनी 'हेल्पर्स'चं काम पाहून त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी बारा एकर जमीन, टाकाऊ नव्हे पिकाऊ भेट दिली. 'हेल्पर्स'नं पाहिलं, जायला पूल हवा, रस्ता हवा. बांधला. आज 'मोरे' नावाच्या गावची पंचक्रोशी 'हेल्पर्स'च्या धडपडीनं विकसित झाली. तिथं काय होतं बारा वर्षांपूर्वी? तपभरच्या 'हेल्पर्स' तपश्चर्येनं सारं उपलब्ध. इंटरनेटसुद्धा!
 शाळा, शेती, डेअरी, काजू कारखाना, काजू बाग, बांबू बेटं, आमराई, बायोगॅस, ट्रॅक्टर सारं सारं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे दीडशे अपंगांचं स्वावलंबी घर, स्पेन, जपान, कॅनडा आणि भारतही या साऱ्यांच्या मदतीनं उभारलेली ‘स्वप्ननगरी' पाहा. स्वप्न पाहायला अक्कल लागते नि ती सत्यात उतरवायला हिंमत! हे येरागबाळ्याचं काम नाही. या संस्थेनं आतापर्यंत १५ कोटी रुपयांची यंत्रणा अपंग विकास कार्यासाठी उभारली असून, आजवर वीस हजार अपंगांना त्याचा लाभ झाला आहे.
 कातळावर फुललेली काजू बाग. टनांनी भरलेली काजू गोदामं. रोज हात, पाय, बोटं नसलेले अपंग प्रत्येकी क्विंटलभर काजू फोडतात. प्रतवारी, विक्री

निराळं जग निराळी माणसं/३५