पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रुपये खर्चुन चार मजली बांधलेली इमारत म्हणजे 'अपंग फ्रेंडली' कॉलेजचा नमुनाच ठरली.
 महेश देशपांडे, अडकलेला पतंगाचा दोरा सोडवायला गेला नि स्वत:च अडकला. दोन्ही हातपाय गमावले त्यानं! महंमद शेखला तर दोन हात जन्मत:च नव्हते. तो सारं पायानंच करायचा. लिहिणं, आकृती काढणं, जेवण, कॉम्प्युटर चालवणं. तो बी.कॉम. झाला. आज एका गादी कारखान्यात अकौंटंट आहे. अश्विनी देसाई तर एम.डी. पॅथॉलॉजी होऊन लॅब इन्चार्ज, पेशंटची 'डॉक्टर' झाली. स्वप्नाहून सत्य निर्मिण्याचा हा चमत्कार म्हणजे हँडिकॅप्डच्या सर्व हेल्पर्सचं समर्पण, त्याग, धडपड, तळमळ आणि समाजाची समर्थ साथ. सरकारची मदत अनुदान म्हणून नसली, तरी जमीन, परवाने, रस्ते इ. तून होत असतेच; पण सारं सहज होत नसतं. इतरांना जो नियम तोच अपंगांना. 'सरकारी काम, सहा महिने थांब', असं असतंच. नसीमदीदी आपल्या प्रत्येक भाषणात यंत्रणेच्या अडथळ्यांबाबत त्वेषाने बोलतात; पण त्या अवलंबून मात्र राहात नाहीत.
 त्यामुळेच 'हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड', कोल्हापूर या संस्थेनं एकामागून एक प्रकल्प हाती घेतले नि तडीस नेले. वसतिगृहाच्या यशानंतर समर्थ विद्यालय, आनंद विद्यालय सुरू झालं. या विद्यालयात आज पाचवी ते दहावीपर्यंतची ५०० मुलं-मुली शिकताहेत. अलीकडे १२ विद्यार्थ्यांपैकी नऊ डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण! 'हम होंगे कामयाब एक दिन' गाणं म्हणत गाठलेलं यश म्हणजे हेल्पर्सच्या कष्टाचं चीज! संस्था प्रारंभीपासूनच अपंगांना कुबड्या, खुर्च्या, कृत्रिम हातपाय इ. साधनं पुरवायची; पण गरज भागत नसे. कारण, प्रत्येक अपंगांची गरज वेगळी असायची. कुणाचा हात खांद्यातून, कुणाचा हात कोपऱ्यातून तर कुणाचा मनगटापासून असायचा. कुणाला बोटंच नसायची, असलीच तर दोन किंवा तीन. तीच गोष्ट पायाची. मग संस्थेनं स्वत:च व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. तिथं अविनाश कुलकर्णी आले आणि त्या केंद्राचे रूपांतर 'अपंग उपकरण उत्पादन व संशोधन केंद्रा'त होऊन गेलं. ते स्वतः बी.ई., धडधाकट होते. फोटोग्राफीचा छंद. भान हरपले. कड्यावरून पडले, अपंग झाले. चाकाची खुर्ची आली. त्यांनी खुर्चीतून नवनव्या पंखांच्या, संशोधनाच्या भराऱ्या मारत प्रत्येक अपंगांच्या गरजेनुसार साधनं पुरवून अपंगत्व निर्मूलनाचा अघोषित कार्यक्रमच सुरू केला. प्रत्येक अपंगाला ते स्वाधार, स्वावलंबी, स्वतंत्र करतात. 'हेल्पर्स'नी पाहिलं की प्रत्येक स्वप्न पुरं करायला पैसे लागतात. अन् पैसे तर रोजच अपुरे; कारण अपंगांच्या गरजा व प्राप्त सुविधांची दरी इतकी मोठी आहे. तो सरकारनं अपंगांच्या गरजांनुसार योजना,

निराळं जग निराळी माणसं/३४