पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/34

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होत होतं; पण त्याला दया, उपकार, देणं अशी झालर असायची व ती नसीमाताईंना अस्वस्थ करायची.
 नसीमा हुरजूक यांना हवं होतं, 'अपंगांचं स्वराज्य'. अपंगांनी, अपंगांद्वारे आणि अपंगांसाठी निर्माण केलेलं. मग त्यातून काही नव्या समविचारी सहकाऱ्यांना घेऊन ‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड' या स्वतंत्र संस्थेचा १९८४ ला उदय झाला. सुरुवातीला सीमाशुल्क कार्यालयाने दिलेल्या स्वत:साठीच्या क्वार्टर्समध्येच काम सुरू केलं; पण त्याला मर्यादा, नियमांचे कुंपण होतं. शिवाय, काम वाढू लागलं, अपंगांचा ओघ सुरू झाला, अपंगांच्या अपेक्षा वाढत गेल्या, तशी कामाची नवी क्षितिजं खुणावू लागली. 'हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड' संस्थेच्या गेल्या तीन दशकांचा आलेख म्हणजे प्रश्नांनी उभारलेली आव्हानं.
 मला आठवतं, आमच्या बालकल्याण संकुलात प्रकाश जोशी नावाचा एक अपंग मुलगा एका ट्रक ड्रायव्हरनं आणून दिला. त्याला त्याच्या अज्ञात आईवडिलांनी जाणीवपूर्वक रस्त्याच्या मध्यभागी ठेवलं होतं आणि ते पळून गेले होते. तो अपंग असल्यानं संस्थेत त्याच्याकडे जितकं पाहावं तितकं कमी पडायचं. सर्वस्वी परावलंबी, परस्वाधीन होता प्रकाश! म्हणून आम्ही नसीमादीदींना सांगितलं. शासकीय वसतिगृहांनी नकार दिला. त्यांची अटच होती, जो स्वत:चं स्वतः करू शकेल त्याला प्रवेश. मग तो अपंग राहतो कसा हे सरकारला कोण समजावणार? न्यायदेवता नुसती आंधळी असते; पण शासनदेवता मुकी, बहिरी आणि खरं तर संवेदनहीन असते, या निष्कर्षापर्यंत मी आणि नसीमदीदी आलेलो. मग आम्ही कोल्हापूरच्या मेरी वॉनलेस हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार, शस्त्रक्रिया करत राहिलो; पण प्रकाश काही हाती लागला नाही.
 म्हणून ‘हेल्पर्स'नी स्वत:चं वसतिगृह सुरू केलं. आज मुडशिंगीच्या माळावर ‘घरौंदा' हे अपंग विद्यार्थ्यांचं भारतातलं आदर्श वसतिगृह सुरू आहे. ते अपंगांसाठीच्या सुविधांनी युक्त आहे. सुलभ उतार (रँप), रेलिंग, ग्रिप्स, अपंगांसाठीच्या सुविधा लक्षात ठेवून उभारलेली प्रसाधनगृहं, फर्निचर, साधनं, सर्वांनी युक्त. प्राथमिक शाळेपासून सुरू झालेल्या अपंगांच्या शिक्षणाचा प्रवास आता मेडिकल आणि इंजिनिअरिंगपर्यंत पोहोचला आहे. 'हेल्पर्स'चे विद्यार्थी कॉलेजात जाते झाले. तेव्हा कोल्हापूरच्या अन्य महाविद्यालयांत त्यांना प्रवेश देत नव्हते; मी पुढाकार घेऊन आमच्या महावीर महाविद्यालयात प्रवेश सुरू केला. रँप बांधले. मुलांच्या सोयीनुसार वर्गाचं वेळापत्रक केलं. कॉलेजमधील अख्ख्या शिपायापासून ते प्राचार्यांपर्यंत सर्वांनी ‘हेल्पर्स' मुलांना तळहाताच्या फोडासारखं जपलं. मी प्राचार्य असतानाच्या काळात एक कोटी

निराळं जग निराळी माणसं/३३