पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अपंगांच्या स्वराज्याचं स्वप्न : 'हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड'

 ही गोष्ट १९६५-६६ ची असेल. तेव्हा नसीमा हरजूक यांचं वय अवघं १६ वर्षांचं होतं. त्यांचं आजवरचं जीवन सर्वसामान्य घरात वाढणाऱ्या एका सामान्य मुलीसारखं होतं. घरी आई, वडील, भाऊ, बहीण असं भरलेलं घर. खेळ, नृत्याची आवड असलेली नसीमा शाळेतील इतर सर्व मुला-मुलींप्रमाणे साऱ्या उपक्रमांत सहभागी होत, जीवनाची इंद्रधनुष्यं रंगवत होती. अन् या धोक्याच्या वयानं धक्का दिला. पाठीच्या मणक्यावरील आघाताने सोळाव्या वर्षी ती पॅराप्लेजिक झाली. कमरेखालची संवेदना हरवली. 'चाकाची खुर्ची'च तिचे पायच काय, साऱ्या जीवनाचा आधार बनली. 'चाकाची खुर्ची' ही त्यांची आत्मकथा वाचताना, हे सारं लक्षात येत असलं, तरी त्यांचं खरं जीवन कळायचं, तर त्यांचं काम समजून घ्यायला हवं.
 तशाही परिस्थितीत त्या अर्थशास्त्र घेऊन बी.ए. झाल्या. सीमाशुल्क विभागामध्ये (सेंट्रल इक्साइज) उपअधीक्षक पदापर्यंत पोहोचल्या. पण, त्यांना त्यांचा आत्मस्वर स्वस्थ बसू देत नव्हता. विशेषतः बेंगलोरच्या बाबूकाका दिवाणांचं जीवन व कार्य पाहिल्यानंतर तर त्यांनी ठरवूनच टाकलं की, एक अपंग दुसऱ्या अपंगांसाठी इतकं करतो, तर मी का नाही? विजयादेवी घाटगे, सुहासिनी घाटगे, विक्रमसिंह घाटगे, रजनी करकरे, मनोहर देशभ्रतार, पी.डी.देशपांडे, श्रीकांत केकडे, जगन्नाथ पाटील अशा अनेकांना जमवून त्यांनी अपंगांना मदतीचा हात द्यायचं ठरवलं. प्रारंभी अपंगांना एकत्र आणणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं, उपचार शिबिरं, शस्त्रक्रिया, उपकरणांचं (कुबड्या, चाकाची खुर्ची, कॅलिपर्स इ.) वितरण असं काम सुरू झालं. काम

निराळं जग निराळी माणसं/३२