पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कंपनीला एक प्रोग्राम हवा होता. निवांतला विचारणा झाली. आनंदच्या मार्गदर्शनाखाली पाच अंध मुलंमुली एकत्र आली. त्यांनी कंपनी स्थापन केली. त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं. या कंपनीतले अंध आता आय.टी.इंडस्ट्री, कॉल सेंटर, इन्फोसिससारखी कमाई करतात. आजही 'निवांत' मधली अनेक मुलं डोळस मुलांपेक्षा अधिक गुण मिळवून त्यांच्या कॉलेजात 'टॉपर' होतात.
 आज 'निवांत' मधील मुलांनी ब्रेल साहित्याचे मुद्रणालय विकसित केलंय. त्यातून मराठीतील साहित्य ब्रेलमध्ये प्रकाशित होतं आणि अंधांना मोफत पुरवलं जातं. सुधा मूर्ती, नसीमा हुरजूक, उत्तम कांबळे, विंदा करंदीकर, पु.ल.देशपांडे, साऱ्यांच्या मराठी पुस्तकांना ब्रेलमध्ये नेलं. कोल्हापूरच्या करवीर नगर वाचनालयानं ब्रेल ग्रंथालयही सुरू केलं. त्यासाठी 'निवांत' च्या मुलांनी एक नाही तब्बल ३५० मराठी ब्रेल पुस्तकं मोफत दिली! या मुलांनी एक संस्था स्थापन केली आहे. 'सो कॅन आय' (आम्हीसुद्धा पाहू, दाखवू शकतो) परवा त्यांनी २० हजार रुपयांची देणगी 'निवांत'ला दिली, स्वकमाईतून!
 निवांत अंध मुक्त विकासालय स्थापन झालं, तेव्हा तो मीराताई व आनंदचा भातुकलीचा संसार होता. आज ते अंधांचं अनभिषिक्त साम्राज्य झालंय. तरीही तिथे आजही एकही पगारी नोकर नाही. आनंद नि मीराताई यांचे डोळे इथल्या सुमारे १५० अंध मुलामुलींना रोज नवा प्रकाश देत राहतात. आजवर या दोघांनी सुमारे १०० मुलामुलींना डोळस, स्वावलंबी केलं आहे. त्यातील अनेक मुलामुलींची आपसात लग्नं झाली. कधी प्रेमविवाह, तर कधी ठरवूनही! त्यांना डोळस अपत्यं आहेत!
 मीराताईंचं या कामातून एक चिंतन तयार झालंय. अंधांचे दृष्टिदोष लहानपणीच लक्षात यायला हवेत. ते जितके लवकर लक्षात येऊन लवकर उपचार सुरू होतील, तितक्या लवकर हे दोष दूर करणं, कमी करणं शक्य असतं. केवळ अज्ञान, दारिद्रय, दुर्लक्षामुळे अंधत्व वाढतं. अंधांना स्वतंत्र शाळांऐवजी सामान्य शाळांतच शिकू, राहू द्यावं. फक्त गरजेनुसार सुविधा, साधन, सेवांचा सुकाळ हवा. 'इच वन, टीच वन' असं व्यक्तिकेंद्रित शिक्षण हा अंधांना स्वावलंबी करण्याचा रामबाण उपाय होय. अंधांना धीर द्या, संधी द्या. त्यांना दया, सहानुभूती नकोय, हवाय केवळ मदतीचा हात. त्यांना धक्के, ठेच बसू द्या. ते स्वतः मार्ग शोधतील. तुम्ही फक्त त्यांचे अडथळे बनू नका. बाकी सर्व ते पाहतील. विशेष वागणूकच एखाद्याला अपंग करते. त्यांना इतरांसारखे समजा नि वागा. त्यांच्याशी मैत्री करा. त्यांचे व्हा!

•••

निराळं जग निराळी माणसं/३१