पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जर्मन शिकवायला सुरुवात केली. हे सारं अकरावी ते एम.ए. बी.एड. डी.एड. बी.बी.ए. बी.सी.ए. बी.लिब., एम.एस.डब्ल्यू, लॉ. फूड क्राफ्ट, डान्स डिप्लोमा आदी अभ्यासक्रमांचं आणि यु.पी.एस.सी./एम.पी.एस.सी. सारख्या स्पर्धा परीक्षांचंसुद्धा! आहे की नाही एक शिक्षकी विद्यापीठ? मीराताईंचं हे निवांत विद्यापीठ सकाळी ५.३० वाजता सुरू होतं, ते रात्री १०.३० पर्यंत चालतं. त्याचं छोटं कारण आहे. प्रत्येक अंधाला त्याची गरज, उसंत असेल, तसं शिकवायचं. मीराताईंच्या वर्गात कधी एक, कधी पाच, कधी ३५ विद्यार्थी असतात. एकाच वेळी त्या इंग्रजी, मानसशास्त्र, अकौंटन्सी शिकवतात. इथं शिकवणं नसतं; समजावणं असतं. मुलं आपापल्या शाळा, कॉलेजात जातात. तिथं ऐकतात, प्रश्न निर्माण होतात. शंका येतात. 'निवांत' मध्ये त्या निवांतपणे सुटतात. सोडवल्या जातात. वर्गातला ‘पॅसिव्ह व्हॉइस' इथे 'ऍक्टिव्ह' होतो! सायन्स कॉलेजात न कळलेला फॉर्म्युला इथं समजतो. कॉलेजमधलं न सुटलेलं गणित इथं हमखास सुटतं. 'निवांत'चं तत्त्व आहे 'वर्क ऍकॉर्डिंगली; टीच इंडिव्हिज्युअली!'
 मीराताई गेली १५ वर्षे रोज १८ तास अविश्रांतपणे २० विषय सरासरी २५ विद्यार्थ्यांना विनासुट्टी शिकवतात. हे जेव्हा मी पाहिलं, तेव्हा उगीच चाळा म्हणून एक गणित केलं. कॉलेजमध्ये सध्या प्राध्यापक २५ ते ३५ हजार रुपये पगार घेतात. दिवसा चार तास शिकवतात. तोही एकच विषय. वर्षानुवर्षं. तिथं शिकवणं असतं; पण संवाद, समुपदेशन, शंका समाधान अपवाद! या पार्श्वभूमीवर मीराताईंच्या कामाचा पगार होतो रोज २० हजार रुपये!
 निवांत अंध मुक्त विकासालयात आज बेकरी, कॉम्प्युटर लॅब, ब्रेल प्रिंटर, ऑडिओ सिस्टीम, अंधांची सर्व सॉफ्टवेअर्स, ब्रेलबुक्स, ब्रेल नोट्स, सर्व आहे व हे सर्व प्रत्येकाच्या गरजेनुसार आहे. म्हणजे इथल्या कॉम्प्युटरवर जॉज, टॅली, ऑटोकॅड, ग्राफिक्स, म्युझिक सर्व आहे. ब्रेल व सर्वसाधारण प्रिंटींग सुविधा आहे. एखाद्या मुलाला अंशत: अंधत्व आहे, तर त्याला त्याच्या दृष्टिदोषानुसार मोठ्या वा मध्यम टाईपमध्ये त्याच्या सर्व नोट्स पुरवल्या जातात. पूर्वी हे काम एकट्या मीराताई करायच्या. आता तयार झालेली अंध मुलं-मुली हे सर्व करतात. आता इ. १२ वी पास अंध इ. ११ वी अंधांचा शिक्षक होतो. बी.एड. झालेली मुलगी डी.एड. झालेल्या मुलीला शिकवते. एम.सी.ए. झालेला अंध बी.सी.ए.ला शिकवतो.
 यामुळेच अंधांचं जगच बदललं. 'हम भी कुछ कम नही' म्हणत 'निवांत'च्या विद्यार्थ्यांनी एकदा तर सिलिकॉन व्हॅलीलाही चकित केलं. अमेरिकेतील एका

निराळं जग निराळी माणसं/३०