पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डिपॉझिट नाही, डोनेशन नाही, अट एकच. अंध असणं. मग मुक्त आणि मुफ्त प्रवेश! हे अंधांचं एक शिक्षकी शिक्षण केंद्र आहे. इथं अंधांना जे जे लागेल, ते पुरवलं जातं. शिक्षण, शिक्षक, मार्गदर्शन, ब्रेल नोट्स, साहित्य, ऑडिओ कॅसेट्स, जॉज (जे.ए.डब्ल्यू. एस- जॉब ऍक्सेस विथ स्पीच) कॉम्प्युटर्स, ब्रेल टंकलेखक- सर्व म्हणजे खरंच सर्व!
 ही संस्था नाही. हे अंधांचं स्वराज्य, साम्राज्य आणि 'घर' या घरात सर्व जण सर्व कार्य निवांतपणे करतात. मीराताई व आनंददादा यांचं हे घर अंधांना आंदण. मीराताई, आनंद व सर्व अंध मुले-मुली या विकासालयात कधी कधी त्यांनीच तयार केलेली प्रार्थना म्हणतात. ती प्रार्थना हेच त्यांचे कर्म, मर्म, धर्म, सर्व काही!
 मीराताईंनी हे काम सुरू करण्यापूर्वी अनेक अंधशाळा, अंध मुलामुलींच्या निवासी सरकारी शाळा, वसतिगृहं पाहिली. त्यांच्या असं लक्षात आलं की, या शाळा, वसतिगृहात मुलामुलींची संख्या अधिक असते. पण त्या प्रमाणात ना कर्मचारी असतात, ना सुविधा; परिणामी अंधांची उपेक्षा, हेळसांड होते. शिवाय, या शाळा, वसतिगृहांतून शिकून, सांभाळून मोठी झालेली मुलं-मुली १८ व्या वर्षानंतर परत एकदा अंध, अनाथ, निराधार होतात. कारण, त्यांचा सांभाळ, संरक्षण, पुनर्वसन, नोकरीचा काहीच कार्यक्रम, योजना नाही. परिणामी, दहावी शिकलेली अंध मुलंसुद्धा भिकारी होऊ शकतात आणि मुली कुणाच्या तरी वासनेची शिकार! हे सगळं बदलायचं, तर आपणास सार्थक, समर्थ पर्याय देता आला पाहिजे. म्हणून मग त्यांनी दहावी पास झालेल्या अंध मुलामुलींच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी हे विकासालय साकारलं. ते सुरू नाही केलं. कामातून तयार झालं. मीराताईंचं म्हणणं आहे की, अनाथपण, अंधत्व, अपंगत्व हा अपघात आहे, त्यावर प्रयत्नाने मात करता येते. मीराताई नि आनंद यांनी हे काम सुरू केलं. पंधरा वर्षांपूर्वी १९९६ पासून. त्यांनी हेही पाहिलं की, इयत्ता दहावीपर्यंत अंध एक तर स्वतंत्र वा नेहमीच्या शाळेत शिकून मॅट्रिक होतात. ज्युनिअर कॉलेज, डी.एड. बी.एड. कॉलेज, विद्यापीठ हे या मुलांचे अडथळे होतं. तिथं त्यांना एक तर प्रवेश मिळत नाही आणि मिळाला, तर लक्ष दिलं जात नाही, सुविधा पुरविल्या जात नाहीत. म्हणून त्यांनी अंध मुलामुलींसाठी दहावीनंतरच्या सर्व प्रकारच्या शिक्षण, शिकवणी, मार्गदर्शन, समुपदेशन, सुविधा, विकास, साधनपुरवठा असं काम सुरू केलं. हे सारं अंधांच्या गरजेतून उभारलं. आकारलं! पहिला मुलगा आला, त्याला इंग्रजी कळायचं नाही, दुसरी मुलगी आली तिला अकौंटन्सी जड जाई, असं करत मीराताईंनी इंग्रजीबरोबर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, अर्थशास्त्र,

निराळं जग निराळी माणसं/२९