पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंधांचं एकलव्य विद्यापीठ : निवांत विकासालय

 मीरा कुर्तकोटी त्यांचं मूळ नाव. कुर्तकोटी हे भारतीय वेदान्त क्षेत्रातील अग्रणी नाव होतं. त्यामुळे त्यांच्या घराण्यात शंकराचार्य परंपरा आहे. नाशिक, कोल्हापूर (करवीर) पीठाचे शंकराचार्य होण्याचा मान मिळालेल्या घराण्यात मीराताईंचा जन्म झाला. त्यांचे वडील सेंट्रल एक्साइजमध्ये मोठे अधिकारी होते व त्यांच्या नेहमी बदल्या व्हायच्या. त्यामुळे मीराताईंचं शिक्षण त्रिस्थळी झालं. १९७४ मध्ये बी.ए. (इंग्रजी) त्यांनी मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून केल्यानंतर मुंबई विद्यापीठातूनच त्या १९७६ साली एम.ए. (इंग्रजी) झाल्या. पुढे बीएड. मग नोकरी आलीच. पुण्याच्या कर्नाटक हायस्कूलमध्ये इंग्रजीच्या शिक्षिका झाल्या. दरम्यान १९७८ मध्ये त्यांचा विवाह आनंद बडवे यांच्याशी झाला. आनंद बडवे व्यवसायानं इंजिनिअर, घरात समाजकार्याची मोठी परंपरा. त्यांचे आईवडील- बाबूराव व कमळाबाई बडवे- स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसचे मोठे पुढारी. असं सारं असताना मीराताई व आनंद यांनी घरातून काही न घेता संसार करायचा निर्णय घेतला.
 मीराताई व आनंद स्वत:च्या पायावर उभे राहू पाहत होते, तेव्हा उभयतांकडे अवघे दहा हजार रुपये व दोन थैल्या कपडे इतकंच होतं, स्वत:चं म्हणून!

 आनंदने पुण्याच्या नवगिरे इंजिनिअरिंगमध्ये नोकरी धरली व मीराताईंनी ट्युशन्स सुरू केल्या. कन्येला जन्म दिला. नोकरी व घर बदलत बदलत, एक दिवस आनंदने स्वत:चा कारखाना सुरू केला. तो स्पेशल परपज मशीन (एस.पी.एम.) क्षेत्रातील नामवंत उत्पादक बनला. एकाचे तीन कारखाने झाले. कोट्यवधीचं उत्पादन असताना, ३२ वर्षं व्यवसायात अहोरात्र मेहनत करणाऱ्या

निराळं जग निराळी माणसं/२७