पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिपस्टिक, पावडर, ब्रँडेड कपडे यांचा शौक; पण सारं नकली वापरण्यावर भर! महिन्यात १५ दिवस चांगला धंदा झाला, तर दिवाळी!
 काही वेश्यांना मुलं असतात. त्यांच्यात मातृत्वाचा झरा असतो. प्रत्येकीची ती आस असते; पण न परवडणारी. मुलं होणं म्हणजे डिमांड कमी होणं. मुलं असतात; पण त्यांना वडील नसतात. वडील कोण, हे ठरवणं अवघड असतं. आजचं गिऱ्हाईक उद्या येतंच असं नाही! मुलं असणं म्हणजे धंद्यात विघ्न. बाळ असलं, तर अफूची गोळी देऊन कॉटखाली, शेजारी निजवायचं. खेळत्या बाळाला धंद्याच्या वेळी पिटाळायचं. रोज मन मारून जगायचं. हेच इथलं जीवन, इथला क्रम!
 वेश्यावस्ती ज्या भागात असते, तिथल्या पोलीसचौक्या हप्त्यांनी बांधलेल्या. तक्रार झाली, केस झाली की, तोडपाणी ठरलेलं. काही साहेबांना मोफत सर्व्हिस द्यायला लागते. सारा मामला 'तेरी भी चूप और मेरी भी.' काही अधिकारी मदत करणारे; पण...
 सण, सुट्या, दिवाळी, ख्रिसमस, मे म्हणजे हंगाम. अलीकडे परिषदा, मेळावे, जत्रा, सभा, बरकत घेऊन येतात. सणासमारंभात ऍडव्हान्स बुकिंगही असतं. अलीकडे नोकरदार (सरकारी, निमसरकारी, खासगी) गिऱ्हाईकांत वाढ, दरही चढे! यांच्या कोठ्यात दिवाळीचा अर्थ रोषणाई, नवे कपडे, फटाके, अत्तर, मिष्टान्न, पण धंदा ठरलेला! रात्र जागी, रात्र बाकी!
 इथल्या जीवनाची सारी मदार कंठलेल्या, गेलेल्या दिवसावर असते. इथला उगवणारा उद्याचा दिवस अशाश्वत असतो. तो असतो अंधार, अंदाज आणि अगर मगरचा! काल आणि उद्याच्या मध्ये सँडवीच झालेलं इथलं जीवन. इथं काहीच नक्की असत नाही. गिऱ्हाईकं दर, मिळकत, दिवस रात्र, जगणं... काहीच नक्की नसलेलं जग.

•••

निराळं जग निराळी माणसं/२१