पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वेश्यावस्तीतलं जग आपल्या जगापासून वेगळं, निराळं असतं. याचं मुख्य कारण इथल्या घड्याळाचे काटे आपल्या घड्याळाच्या उलट दिशेने फिरत असतात. आपला दिवस मावळतो, तेव्हा त्यांचा दिवस उजडत असतो. आपल्या घरी उठायची लगबग असते, तेव्हा तिथलं जग साखरझोपेत असतं. कधी पाच दहा अन् मोसमात पंधरा वीस गि-हाईकं झेलत मलूल झालेल्या शरीराला झोपावं लागत नाही. कूस बदलावी लागत नाही. गिऱ्हाईक मंदावलं की शरीर, डोळे, इंद्रिय आपोआप मिटतात.
 संध्याकाळ ते पहाट हा त्यांचा दिवस असतो. ही वेळ आपल्या मंडई, बाजार, ऑफिसेस, बँकांच्या लगबगीसारखी इथं कशी फुलून येते. आपली पहाट ते दुपार म्हणजे त्यांची रात्र. आपली वामकुक्षी म्हणजे त्यांची सकाळ. तयार होण्याची वेळ. दात घासणं अर्धा तास, मशेरी लावणं, गप्पा, फिरक्या, कालच्या गिऱ्हाईकांच्या गंमती, कोठीवाली, दलालांचे हिशोब करत संध्याकाळ केव्हा होते कळत नाही. संडास, अंघोळीसाठी पाळी, भांडणं, झिंज्या उपटणं रोजचंच. शिव्या हा संवादाचा अविभाज्य भाग, वेश्या आणि पोलीस यांच्या भाषेत, उच्चारात बरंच साम्य असतं. इथं रजा नसते, खाडा नसतो; असलाच तर ओव्हर टाइम! तुमचा सुट्टीचा दिवस म्हणजे इथं हंगाम, वसंत ऋतू असतो! इथे कोठीवाली असते बॉस. ती दरडोई गिऱ्हाईकं मोजत हिशोब घालते. कोणी आपल्या खोलीच्या स्वत:च मालकीणी असतात. स्पेशल खोली मात्र क्वचित! तशी असेल तर ती राणी! त्यांचा मेहनताना अनिश्चित. तो गिऱ्हाईक, सवड, फर्माईशीवर ठरतो. कोठीतला, खोलीतला दर वेगळा, हॉटेलात रात्र घालवायची, तर दर वेगळा. विदेशी, आयटीमधलं बिझनेसमन गिऱ्हाईक म्हणजे मालामाल। आर्मी टोळधाड म्हणजे मारामारी! प्रत्येक रात्र जीवघेणी असते, प्रत्येक गिऱ्हाईकाची तऱ्हा वेगळी, ध्येय एकच, बक्कळ पैसा! प्रत्येक गिऱ्हाईक त्यांच्यासाठी वेगळं; पण प्रत्येक गिऱ्हाईकच्या लेखी त्या मात्र वेश्याच!
 त्यांचा मुख्य खर्च खोली भाडं, कपडे, नट्टापट्टा, चहापाणी, जेवण कधी फुकट, तर कधी पदरमोडीचं! ऑन कॉलही जावं लागतं. कधी घरी, ऑफिसात. लॉज, लॉन, बीचवर, कधी गिऱ्हाईक मिळवावं लागतं. तर कधी दलाल घेऊन येतात. कोण प्रामाणिक, कोण बेईमान. सर्व अनुभवानं ठरतं! दलाल असतात त्यांचे संरक्षक गार्ड!
 बऱ्याच जणी अगोदर अल्पवयीन वेश्या. प्रौढ होऊनही येतात; पण त्यांना डिमांड कमी! प्रौढ गिऱ्हाईकही अल्पवयीन वेश्येचीच डिमांड करतं.

 वेश्यावस्तीचं उदरभरण म्हणजे 'बी व्हिटॅमिन' - बिर्याणी, बर्गर, बियर, बीफ! फेअर अँड लव्हली, पँटीन, हेअर अँड शोल्डर, परफ्युम्स, डीओ,

निराळं जग निराळी माणसं/२०