पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोंधळ नको म्हणून बिर्याणी खिलवली. बरॅकमध्ये विभागणी केली. तशी 'कॉट कहाँ है? गद्दी कहाँ है?' 'मच्छर बहुत है, म्युझिक नहीं?' हे सर्व प्रश्न आम्हाला नवे होते आणि बुचकळ्यात पाडणारे होते.
 केसेस सहा महिने चालत राहिल्या. कोर्ट व शासनाने त्यांना पुनर्वसनाचे पर्याय द्यायचे आदेश काढले. पण, या मुली प्रतिसाद द्यायला तयार नसायच्या. त्या रेड लाइट संस्कृतीत मोठ्या झाल्या होत्या. त्यातील अधिकांश बांगला देश, नेपाळ, आसामच्या; नंतर दक्षिणेतल्या अधिक, महाराष्ट्रीय कमी. त्या काळात आम्ही पत्ते मिळवून पालक, घरे शोधली. काही मुलींनी पालकांकडे जायचं नाकारलं. काहींना पालकांनी नाकारलं. अपवादात्मक मुली घरी गेल्या. त्यांची वयं ठरवणं मोठं दिव्य काम होतं. अधिकांश अशिक्षित. जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला नाही. वय ठरवणं आवश्यक होतं. एक्स-रे मशिननी मदत केली. ससूनमधून वयाचे दाखले मिळवले. बऱ्याच प्रौढ निघाल्या नि आम्ही आणि पोलिसांनीही सुटकेचा श्वास सोडला. त्यांच्या केसेस निकाली निघाल्या. त्या परत कोठ्यांवर हजर झाल्या. ज्या अल्पवयीन होत्या, त्यांना सांभाळलं. त्यातल्या काही खरंच गरिबीमुळे वेश्या व्यवसायात आलेल्या. काहींना बापांनीच विकलेलं. काहींना कामाच्या आमिषानं फसवलेलं. काही स्वतः पळून आलेल्या. काही नट्या होण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या. यातल्या रंजना, सबीना, जमिला, मृगा, जॅकी, लैला, सकीनाबी, अर्जुना, स्टेला, रुख्माक्का, अकैय्या यांच्या कहाण्या आजही माझ्या मनात घर करून आहेत. नंतरही मी कधी कंडोम्सच्या प्रसार प्रचारासाठी, एड्स प्रतिबंध कार्यक्रमासाठी, कधी वेश्यांच्या मुलामुलींच वसतिगृह चालवायच्या निमित्तानं, वेश्यांच्या मुलांचं पाळणाघर, बालवाडी चालवायचं म्हणून अनेक वेश्यावस्त्यांना भेट देत राहिलो.

 मला आठवतो दिल्लीचा जी. बी. रोड-गार्टिन बॅशन रोड. ते एका ब्रिटिश कलेक्टरचं नाव. मध्ये या मार्गाचं नाव बदलून स्वामी श्रद्धानंद मार्ग केलं. चांगल्या हेतूने, पण गिऱ्हाईके, रिक्षावाले, टॅक्सीवाले, सर्वांच्या लेखी तो अजून जी.बी.रोडच आहे. गेल्या शतकात होता तसाच. तीच गोष्ट मुंबईच्या कामाठीपुरा नि फोरास रोडची. मी कळत्या वयात पहिल्यांदा दुरून, जिज्ञासेनं पाहिलेल्या या वस्त्या. आजही, बाहेरून आहेत तशा. आत मात्र कुठं कुठं स्पार्टेक्स, मार्बल आलाय. रेडिओची जागा टीव्हीनं घेतली. गल्ल्यांची व जिन्यांची रुंदी मात्र आधीचीच. पुण्यातली बुधवार पेठही याला अपवाद नाही. एक बदल झालाय अलीकडे. आयटीतलं गिऱ्हाईक वाढलं, तसा दर वधारलाय. पूर्वी आर्मीचं फुकट गिऱ्हाईक मोठं होतं. आषाढात गिऱ्हाईक वाढतं. हा नवा ट्रेंड आहे.

निराळं जग निराळी माणसं/१९