पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपली सर्व यंत्रणा पणाला लावून व भरपूर होमवर्क करून त्यांनी कामाठीपुरा, फोरास रोड आदी वेश्यावस्त्यांवर छापे टाकले व एका दिवसात शेकडो अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली. त्यातून त्यांना सांभाळण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला. यापूर्वीही मोहिमा होत; पण जुजबी अटक व्हायची. निभावलं जायचं! पण, आता ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग' अशी स्थिती निर्माण झाली!
 मला तो प्रसंग चांगला आठवतो. चिल्ड्रन एड सोसायटी, महाराष्ट्र परिवीक्षा, महिला बाल कल्याणचे सर्व संचालक, परिवीक्षा अधिकारी गांगरलेले होते, ते मुलींच रूप, अवतार बघून, त्यात पोलिसांनी 'सब घोडे बारा टक्के' समजून मुलींबरोबर प्रौढ महिलांनाही अटक केली होती. या शेकडो मुली, महिलांना आमच्या संस्थांतील मुलींबरोबर ठेवणं म्हणजे 'आ बैल मुझे मार' अशी स्थिती! मग आम्ही एक निर्णय घेतला की, या सर्वांवर नियंत्रण ठेवायचं, तर त्यांना एका स्वतंत्र संस्थेत ठेवायचं. या निर्णयालाही एक कारण घडलं. पोलीस जेव्हा अशी अटक करतात, तेव्हा जाबजबाब, पंचनामा, एफ.आय.आर. यात भरपूर वेळ जातो. अटक केल्यापासून चोवीस तासांच्या आत न्यायालयासमोर कागदपत्रं, कलम यासह हजर करणं बंधनकारक असतं. दरम्यान त्यांना कुठं तरी एकत्र ठेवावं लागतं. शेकडो मुलींना एकत्र ठेवणारी कस्टडी नव्हती. संडास, बाथरूम नव्हते. या मुली-महिलांना पोलिसांनी भत्त्यातून पुरीभाजी आणली, तर ती त्यांनी साफ नाकारली. 'बिर्याणी है तो बोलो! बियर कहाँ है? साला बर्गर तो देते! कोठे पे आते है, तो इंग्लिश फर्माते है (स्कॉच व्हिस्की) और यहाँ चाय पिलाते है पानी का. भाडखाऊ साले!' असे डायलॉग ऐकून पोलीस केव्हाच बाजूला झाले होते. आता कसोटी आमच्या परिवीक्षा अधिकाऱ्यांची नि आमची होती.
 दरम्यान, कोठीवाल्या मालकिणी, दलाल, पंटर, प्रियकर, गिऱ्हाईकं (कायमची) यांची गर्दी वाढत होती. काळ्या धंद्याची सूत्रे हलवणाऱ्या व्हाइट कॉलर सोशल वर्करांचे फोन घणघणत होते. क्षणाक्षणाला प्रेशर वाढत होतं. आम्ही हातातला वेळ लक्षात घेऊन स्ट्रॅटेजी तयार केली. या मुली, महिलांना मुंबईत ठेवणं धोक्याचं, कटकटीचं ठरणार, असा अंदाज घेऊन न्यायालयाचा आदेश होताच यांना मुंबईबाहेर काढायचं ठरलं. पुण्याजवळील मुंढवा येथे आमचं मुलींचं सर्टिफाईड स्कूल होतं. प्रशस्त व बंदिस्त. रात्रीत ते रिकामं केलं. तेथील मुली दुसऱ्या संस्थेत हलवल्या. तिथे अधिक स्टाफ आणला.

 दुसऱ्या दिवशी कोर्ट ऑर्डर होताच सगळ्या गाड्या सायंकाळी चार पाचपर्यंत पुण्यात दाखल झाल्या. काही रात्री आठपर्यंत येत होत्या. सलामीला

निराळं जग निराळी माणसं/१८