पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलं खरंतर मुलंच असतात. मुलांना वंचित पालक, शिक्षक, समाज, सरकार बनवते घडवते ते आपल्या पारंपरिक दृष्टीइतकेच मर्यादित असते.
 मार्गारेट सँगर नावाच्या एक समाजसुधारक होत्या. पहिल्या महायुद्धानंतर त्यांनी संततीनियमनाच्या क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. त्या मुलांच्या वकील होत्या. त्यांना असं वाटायचं की, मुलाला जन्म देण्याचा- न देण्याचा अधिकार स्त्रीला हवा. त्याचं कारण होतं...अवघं ५० वर्षं आयुष्य लाभलेल्या तिच्या आईला १८ बाळंतपणं सोसावी लागली. त्यातली सात मुलं बाळंतपणातच मेली. उरलेल्या ११ मुलांचा सांभाळ करतानाची आईची कसरत तिनं पाहिली होती. मुलं जन्मण्याचा अधिकार आईकडे नसल्यानं वंचितांची फौज तयार होते. मुलांना 'उद्या' हे उत्तर असत नाही. कारण त्याचं नाव 'आज' आहे म्हणणारा गॅब्रियल मिस्ट्रल हा वंचित बालकांचा तारणहार होता.
 संजय हळदीकरांचं कार्य म्हणजे वंचित बालकांना त्यांचं भावविश्व बहाल करण्याचं एकच आंदोलन होय. खलील जिब्रानसारखे ते 'मुलांना तुमचे प्रेम द्या; पण विचार नका देऊ' म्हणून सांगतात तेव्हा त्यांना हे पक्के माहीत असतं की, मुलांचं जीवन म्हणजे उद्याचं भविष्य. ते मागं नसतं जात...भूतकाळात नसतं रेंगाळत. तुमच्यासारखं मुलांना बनवण्याचा प्रयत्न करणारे पालक वर्तमानाला भूतकाळ बनवत असतात. संजय हळदीकरांचे सारे कार्य, प्रयत्न म्हणजे वंचितांना वांछित बनविण्याची धडपड! त्यांचा हा प्रयत्न एकाच वेळी शिक्षण, समाज, संस्कृती, संस्कार, कला यांचा गोफ गुंफत बाल्य भयमुक्त करण्याचा एक सकारात्मक खटाटोप होय. असे खटाटोप घरोघरी होतील, तर घर तुरुंग व्हायचे थांबतील अन् बाल्य भयमुक्त होईल.

•••

निराळं जग निराळी माणसं/१४६