पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांस्कृतिक, वाचन, फलक लेखन सारं अंधांनी केलेलं... काही आंशिक अंध, काही पूर्ण, कोण विद्यार्थी, कोण शिक्षक... मी सोडून सारे अंध... खरं तर एक अंध व सारे डोळस... कारण ते सारं ज्या आत्मविश्वासाने व डोळ्यांच्या मदतीशिवाय करत होते ते माझे डोळे उघडणारं होतं... निकम सरांनी प्रास्ताविक केलं... "आज आपण पांढरी काठी दिन कुणी आपली दया करावी म्हणून साजरा करत नाही... आज आपण स्वावलंबी होण्यासाठी एकत्र आलो आहोत... कुणी मदत केली तर स्वागतच... पण आता भीक नाही मागायची... मागायचाच तर हक्क मागायचा... कर्तव्याचे आवाहन करायचं." मग पुंड बाईंनी माझा परिचय करून दिला... कार्यक्रमाची पाहुण्यांच्या निवडीची भूमिका विशद केली... "सरांना आपण प्राचार्य म्हणून आमंत्रित केलं नाही... 'माणूस' म्हणून बोलावलंय." हे सारं मला ओरखडणारं, खडखडणारं होतं... कारण त्यांच्या प्रत्येक शब्द नि कृतीत समाज त्यांना नाकारतो कसा, उपेक्षित कसा करतो, याचा विश्वास होता... ते कोल्हापूर महापालिकेबद्दल मात्र भरभरून बोलत होते... अंधशाळेस जागा दिली... सिटीबस पास मोफत दिले. एकात्मिक विकास व सर्वशिक्षा अभियानात अंध विद्यार्थी, शिक्षक अभियान राबवलं असं बरंच!
 पांढरी काठी दिन होऊन सहा महिने उलटले असतील एक दिवस मला फोन आला... "मी भारत निकम सर... अंध शिक्षक... आपण पांढरी काठी दिनाला भेटलो आहोत... तुमच्याशी बोलायचं आहे... संगीता पुंड बाईही येणार आहेत... फक्त तुम्ही निवांत पाहिजे..." मग आम्ही भेटलो. दोघांनी आपलं मनोगत स्पष्ट केलं... त्या वेळी आम्ही कोल्हापुरात आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह मंडळाचे काम सुरू केले होते... अशा विवाहांना प्रोत्साहन, साहाय्य करून जाती, धर्मनिरपेक्ष समाजनिर्मितीचा तो प्रयत्न होता. असे जाहीर विवाह करायचो... वृत्तपत्रे, वाहिन्या या कार्यक्रमांची प्रशंसा नि प्रसिद्धी करत. ते वाचून ऐकून भारत व संगीताने आपला विवाह आमच्या मंडळांनी करावा म्हणून विनंती केली... दोघे अंध होते, तरी स्वावलंबी होते. घरच्यांचा विरोध होता; "पण तुम्ही अनाथ होता म्हणून अनाथ कल्याणाचे कार्य करता... नसीमा हुरजूक अपंग म्हणून अपंग कल्याणाचे... आम्हाला त्या पावलावर पाऊल ठेवून पुढं कार्य करायचं आहे." मी आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना हे सांगितलं, तसं सर्वांच्यात उत्साह संचारला. भरपूर तयारी, सुशोभन करून केलेल्या विवाहास शाहू स्मारक भवन पुरोगामी कार्यकर्त्यांनी खचाखच भरलेलं होतं. साने गुरुजींची सत्यशोधक शपथ घेऊन महात्मा फुल्यांच्या पद्धतीनं विवाह सोहळा पार पडला.

निराळं जग निराळी माणसं/१३८