पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्वत्र आमुच्याच खुणा : संगीता आणि भारत निकम

 ऑक्टोबर, २००६ असावा. मी प्राचार्य होऊन वर्ष उलटलेलं होतं. या काळात मी विद्यापीठ अनुदान आयोग; नवी दिल्लीच्या योजनेत महाविद्यालयातील अपंग विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी करत आणल्या होत्या. त्यात अंधांसाठी बोलका संगणक, ब्रेल टंकलेखक, सी.डी. प्लेअर्स, वॉकमन्स अशा सुविधा करत आणल्या होत्या. वर्षभराच्या या प्रयत्नांना यश येऊन आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक अंध विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात आले होते. ज्युनिअर व सीनिअर कॉलेजला मिळून ही संख्या पंधरावर येऊन पोहोचली होती. विद्यार्थी रोजच काही ना काही कारणांनी भेटत असत. त्या दिवशी सर्व अंध विद्यार्थी मिळून भेटायला आल्याची सूचना शिपायांनी दिली तसं मी त्यांना लगेच आत बोलावलं... "सर, १५ ऑक्टोबरला 'पांढरी काठी दिन' (अंध दिन) आहे. आम्ही शहरातील सर्व अंध मिळून तो साजरा करणार आहोत... महानगरपालिकेच्या अहिल्याबाई होळकर विद्यालयात... तुम्ही पाहुणे म्हणून यावं. अशी आमची सर्वांची इच्छा नि विनंती आहे... तुम्ही हो म्हणाल, तर आमच्या पुंड बाई, निकम सर तुम्हाला भेटायला येतील..." मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं... सरांना, बाईंना नका पाठवू... मी येतो म्हटलं नि जाऊन पोहोचलो.
 शाळेत पाहिलेलं दृश्य विलक्षण होतं... त्या कार्यक्रमांनी मला नवी दृष्टी दिली. आधी मला डोळे होते. या कार्यक्रमांनी मी डोळस झालो... आधी मला दिसायचं... आता मी पाहू लागलो... त्या कार्यक्रमाचं सारं अंध बांधव करत होते... रांगोळी, सजावट, पूर्वतयारी, ओळख, भाषण, हार-तुरे... चहापान,

निराळं जग निराळी माणसं/१३७