पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुरुष, तरुण, वृद्ध, मुले सर्वच असतात...कोण सवस्त्र, कोण निर्वस्त्र...अर्धनग्न व कधी पूर्ण नागडेही...ते तसे झाले की, मग पोलिसांना जाग येते...समाजस्वास्थ्य या नावावर त्यांना अटक केली जाते...मग त्यांची रवानगी जवळच्या भिक्षेकरी गृहात किंवा मनोरुग्णालयात (मनोविकास केंद्रात केली जाते...मनोरुग्णालयाचे नामांतर झालं तसं भिक्षेकरी गृहाचेही व्हायला हवं ...मानव विकास केंद्र). ते मागून खातात. उकिरडे धुंडाळतात. हल्ली हॉटेलमध्ये खाणाऱ्यांची संख्या वाढते आहे... हॉटेलमध्ये जितकं खाल्लं जातं, त्यापेक्षा टाकलं अधिक जातं, हे किती लोकांना माहीत आहे. जे टाकलं जातं ते खरकटं बादल्या, बॅरल्स भरून टेकअवे ट्रक्समध्ये ओतलं जातं...काही उकिरड्यात फेकलं जातं...अशा ठिकाणी ही सारी माणसं (?) ते चिडवत, निवडत, खात बसलेली असतात...असं दृश्य पाहिलं की, मला हिंदी कवी 'नवीन' यांच्या ओळी त्रास देऊ लागतात...अस्वस्थ करतात...
 लपक चाटते जुठे पत्ते

 जिस दिन देखा मैंने नर को |

 उस दिन सोचा, क्यों न लगा दूँ ?

 आज आग मैं दुनिया भर को ||
 अशी लागलेली आग एक दिवस अशोक रोकडे यांना दिसली अन् जीवन मुक्तीचा जन्म झाला.
 त्याच्या जन्माची पण एक कहाणीच आहे. घरोघरी माणसं मरतात. तशी ही रस्त्यावरची बेवारशी माणसं पण मरतात. कधी रस्त्यावर, कधी रेल्वेच्या डब्यात, कधी कुठे...कधी कुठे...पोलिसांना त्याची वर्दी जाते...पोलीस ते प्रेत शासकीय जिल्हा रुग्णालयात नेतात. तिथं शवागर...प्रेतालय असतं...पाहिलंय तुम्ही? माणसास जगणं घृणास्पद करणाऱ्या या जगात मरणंही घृणास्पद, किळसवाणं असतं. कुजलेलं प्रेत उचललंय तुम्ही कधी? मी उचललंय ...एकदा नाही अनेकदा..त्याची सुरुवात अशोकनीच करून दिल्याचं आठवतं. प्रेताला जिथं हात लावाल उचलायला म्हणून तिथं तुमचा सारा हात आत कुजलेल्या मांसात घुसतो...चिखलात हात घातला की घुसतो तसा, वर दुर्गंधी, विद्रूपता इतकी की पहिल्यांदा हे करता, पाहता तेव्हा नाकातले केस जळतात...डोळ्यांतलं सौंदर्य संपतं...कानाच्या पाळ्या गरम होऊन ऐकायला येणं बंद व्हावं...सारी संवेदना शून्य करणारं ते प्रेत...पुरुष वा स्त्री जातीचं...माणसांचं प्रेत होणं काय असतं ते तिथं समजतं...उमजतं!

निराळं जग निराळी माणसं/१३३