पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शोकार्थ अगस्ती : अशोक रोकडे

 मराठीतील प्रख्यात कथाकार आहेत व. पु. काळे. ते सुंदर कथाकथन करायचे. ते भावस्पर्शी असायचं. इतकं की एकदा का तुम्ही त्यांची कथा ऐकली की, ती तुमच्या काळजात कायमची कोरली जायची. अशीच एक कथा मी त्यांच्या तोंडून ऐकली होती. 'केव्हाही बोलवा' तिचं नाव. त्यांच्या 'इन्टिमेट' संग्रहात ती आहे. ती कथा वास्तवातून आली की, कल्पनेने मला माहीत नाही...त्यात काही स्वयंसेवक, सेवाभावी लोकांची संस्था आहे. 'केव्हाही बोलवा' हे त्यांच्या गटाचं, संस्थेचं नाव...त्यांचं एक व्हिजिटिंग कार्डही असतं...त्यावर संस्थेचे नाव, फोन नंबर असतात...तुम्ही फोन केला की, ते तुमच्या मदतीला धावून येतात... अट एकच...मदत करणाऱ्यांच नाव, पत्ता विचारायचं नाही...आभार, भेट, चहापान, मानधन नाही...तुमची गरज, संकट असतं तेव्हा ते तुमचे जिवाभावाचे आत्मीय असतात. तुमची गरज संपली की ते गायब होतात.
 व. पुं. च्या त्या कथेतले लोक कोल्हापुरात आहेत. त्यांची एक संस्था आहे... 'जीवन मुक्ती संस्था'. अशोक रोकडे नावाचा एक तरुण ती चालवतो. संस्था कामातून जन्मली. गाव, शहर, महानगर काहीही असो...प्रत्येक गावात निराधार, वेडे, भटके, बेवारशी लाकांची वस्ती असते. ते रस्त्याच्या कडेला, रेल्वे, एस.टी. स्टॅन्डच्या प्लॅटफॉर्मच्या कडेला, बसस्टॉपच्या वळचणीत, फ्लायओव्हर पुलांच्या खाली, रस्त्याच्या आडोशाला कोपऱ्यात राहून आपलं जीवन कंठत असतात. त्यांना आगापीछा...त्यांचं नाव नसतं. त्यांना वंश, जात, धर्म नसतो...समाजाच्या लेखी ते वेडे, लफंगे, बेवारशी...त्यात स्त्री,

निराळं जग निराळी माणसं/१३२