पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पी.डी. चांगले कौन्सिलर आहेत. वसतिगृहातील मुला-मुलींचे पी.डी. काका म्हणजे अभयपद! जा, भेटा, बोला...प्रश्न संपला...मिटला समजा, पी.डी. चांगले शिक्षकही आहेत. ज्योती कॉम्प्युटर्स नावाच्या त्यांच्या संस्थेत ते शिकवतात. ते मॅनेजमेंट गुरुही आहेत. त्यांची "Seven Seas" नावाची पुस्तक मालिका हातोहात विकली गेली. इंग्रजी डाव्या हाताचा मळ. ड्राफ्टिंगमध्ये ताकद इतकी की, त्यांनी लिहिलेल्या देणगी पत्रांना नकार, अपयश माहीत नाही. अशक्य ते शक्य करिता सायासच्या ओळी पी.डी.वरूनच बेतल्या असाव्यात. राष्ट्रपती, पंतप्रधान, स्टीफन हॉकिंग कुणालाही भेटायचं असो...मिशन पी.डी.वर सोपवा...फत्ते झालं समजा.
 मी अंधश्रद्ध नाही; पण पी.डी. नावाचा माणूस तुम्हाला आपल्या काया, वाचा, मने मोहवून टाकतो...आपलंसं करतो तेव्हा वाटू लागतं, याचा हातगुण, पायगुण, तपासायलाच हवा...उत्खनन करताना लक्षात येतं की, त्यांच्या कामाच्या यशाचे रहस्य त्यांच्या कार्य समरसतेत आहे. मनस्वी, नि:स्वार्थी कार्य करा. यश येणारच. हा असतो पी.डी.च्या कार्याचा वसा आणि वारसा. निराळ्या जगातली माणसं म्हणजे केवळ अंध, अपंग, अनाथ नव्हेत. अलीकडे अपंगांना 'विशेष सक्षम' (Differently Abled) म्हटले जातं. पी.डी. ही विशेष सक्षम गृहस्थ होत. जे तुमच्या माझ्यात नाही, ते त्यांच्यात...म्हणून ते निराळे!
 आजचं स्वकेंद्रित, भ्रष्टाचारी जग पाहिलं की, पी.डीं. सारखी माणसं या जगात असतात, यावर विश्वास नाही बसत; पण अशी माणसं पाहिली, अनुभवली की, जगण्यावरची श्रद्धा वाढते. 'या जगण्यावर शतदा प्रेम करावे', असं वाटू लागतं. इव्हान लोमेक्स नावाच्या एका समाजसेविकेस आम्ही लाखाचा निधी द्यायचा ठरविला. पी.डीं.नी हजार रुपये भरून खातं सुरू केलं नि आपल्या मित्रांचे हजारो रुपये आणले. ते बँक मॅनेजर असताना त्यांची युनायटेड वेस्टर्न बँक त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवायची. शाखा डबघाईला आली, पी.डीं. ना पाठवा. नवी शाखा उघडायची आहे. पी.डी. ना पाठवा. एनपीए अकौंट आहे, (कर्ज वसूल होत नाही) पी.डी.वर सोपवा. पी.डी.कडे एक शस्त्र आहे. ते पोटात शिरतात, मधाळ बोलतात, रेड्यामुखी वेद, भले तरी देऊ कासेची लंगोटी, असं सारं ते करतात. माणूस पणाला लावायचा आहे...पी.डीं.ना पाठवा. परवा माझा एक मित्र म्हणाला... "कशाला पाहिजे क्रिकेट डिप्लोमसी...पीडींना पाकिस्तानात पाठवा...ते पाकिस्तानच भारतात मर्ज करतील..." पी.डी. म्हणजे हर मर्ज की दवा! कोट्यवधी रुपये अपंग कल्याणासाठी जमविणारा हा भगीरथ. इथं गंगाही नतमस्तक!!

•••

निराळं जग निराळी माणसं/१३१