पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घायलों का कायल : पी. डी. देशपांडे - करकरे

 तसं त्यांचं नाव प्रमोद देशपांडे, पण ते पी.डी. या नावानेच सर्वत्र ओळखले जातात. पी.डी. हे कोल्हापुरातलं बहुपेडी व्यक्तिमत्त्व. कोल्हापुरात भारतातील सर्वोत्कृष्ट अपंग वसतिगृह आहे. ते केवळ वसतिगृह नाही. अपंग सुविधा विकास व पुनर्वसन केंद्र म्हणूनही त्याचं महत्त्व आहे. हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड असं त्या संस्थेचं नाव. त्या संस्थेचे मुख्य कार्यकर्ते नसीमा हरजूक, रजनी करकरे या दोघी भगिनी अपंग. त्यांच्यामागचे शिलेदार सर्वश्री पी.डी., मनोहर देशभ्रतार, श्रीकांत केकडे आदी धडधाकट. 'तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' असा त्यांचा पवित्रा असतो. 'तुम लढो, हम कपडे संभालेंगे' सारखं कातडी बचाव इथं काही नसतं. सर्वस्व झोकून करायचा इथला रिवाज.
{{gap}यातले पी.डी. हरहुन्नरी, हिशेब, कला, संवेदना, अप्रसिद्धी, मितभाषी, पडद्यामागचे कलाकार, असं त्यांचं वैशिष्ट्य. सर्व करतात नि नामानिराळे राहतात. हे त्यांना जमतं कसं, याचं मला आश्चर्य वाटलं म्हणून मी शोध घ्यायचं ठरवलं तेव्हा लक्षात आलं की, हे बेणं काही औरच! अनवट, अनघड आणि अवघडही!
 पी.डी.चे वडील प्राथमिक शिक्षक, पी.डी. जात्याच हुशार. म्हणून दोन वर्षांत त्यांनी तीन इयत्ता पास केल्या. त्यामुळे प्रत्येक वर्गात सर्वांत लहान, पण यशात महान! टॅलन्ट सर्च ओ.के. स्कॉलरशिपला बसवलं की मिळालीच समजायची. पहिलीत असताना इन्स्पेक्टरनाही त्यांनी चारीमुंड्या चीत केलं. पहिलीचे प्रश्न ते विचारायलाच लागले, तर या महाराजांनी सांगून टाकलं...मला तिसरीचीपण उत्तरं येतात. त्याचं कारण गुरुजींचा मुलगा म्हणून यांचा सर्व शाळेत संचार असायचा!

निराळं जग निराळी माणसं/१२७