पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तुटलं... नवरा गमावला. आता तिचं घर 'समाजघर' झालंय. ग्रंथ आणि कादंबरी ही तिची पोटची मुलं अवनीच्या अन्य ३५ मुलांपैकीच एक होत. हे सोपं नसतं... ग्रंथ परवा आईला म्हणाला... "आता मी मुलांतच झोपणार... तुझ्याकडे नाही." ऐकताना अनुराधाच्या एका डोळ्यात दु:खाश्रू तर दुस-यात आनंदाश्रू...आपपराचं द्वंद्व जगणारी अनुराधा...तिला आता तिचे असे कोणीच नाही...सारे जोडलेले...रक्ताचे कोणीच नाही...तिचं एक नवं तत्त्वज्ञान निर्माण झालंय...रक्त, जात, नातं सारं झूठ! खरं एकच माणूस माणूस जोडणं...माणूस माणूस जपणं! संघर्ष, त्यागात जे जीवन, जग आहे, ते स्वार्थमय भोगात नाही. नवरा नसणं, नातलग नसणं हे दु:ख असूच...होऊच शकत नाही. हतबलता म्हणजे दु:ख! आता मी तर भीष्म प्रतिज्ञाच केलीय...परिस्थितीशरण म्हणून जगायचं नाही. मीच जगातली सर्वांत सुखी. कारण माझं स्वत:चं जगणं असं राहीलंच नाही. मी आता म्हटली तर एकटी...समाजात अनेक एकट्या स्त्रिया राहतात. मला आता त्यांच्या हक्काची लढाई खेळायची आहे. अनुराधाची एक लढाई जिथे संपते तिथं दुसरी सुरू होते. त्यामुळे प्रत्येक वेळी मला वेगळी अनुराधा भेटते. तिच्या जागी असणारं, वसणारं नित्य अस्वस्थपण, बेचैनी हीच तिची जीवन ऊर्जा आहे, असे मला वाटत राहते. ३५ मुलांचं घर सांभाळायला महिन्याकाठी लागणारे ३६,००० रुपये तिची चिंता असते. गांधी पीस फाऊंडेशन ती मिटवत असले तरी त्यात ती समाधानी नाही. तिला घराबाहेरची अनेक बालमजूर मुलं-मुली खुणावत, बोलावत असतात. रस्त्यावरचं रोज उद्ध्वस्त होणारं बाल्य तिचं शल्य आहे. ते दूर व्हायचं तर आपण तिच्या हातात हात घालायला हवे. बालकांना सोनेरी भविष्य व उज्वल बाल्य देण्यासाठी San_verala @ sanchar.in क्लिक करा नि बालमजूर बालकांचे जीवन उजाळा.

•••

निराळं जग निराळी माणसं/१२६