पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकदा महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी कोल्हापूरला आले होते. त्यांनी अनुराधाचं काम पाहिलं. ते त्यांना महात्मा गांधींचं खरं काम वाटलं. त्यांची एक संस्था आहे. गांधी पीस फाऊंडेशन. ते जगभर व्याख्याने देतात. त्यातून येणाऱ्या मानधनातून त्यांची संस्था चालते. आता त्यांचा मुलगा तुषारही या कामात आलाय. त्यांनी अनुराधाला मदतीचा हात दिला. तिचं काम स्थिरावलं. त्यामुळे आता अरुण गांधी व तुषार गांधीनीच कोल्हापूरला यायचं ठरवलंय. 'नई तालीम' या गांधींजींच्या मूलोद्योगी शिक्षण विषयक प्रकल्प ते येथे सुरू करणार आहे. अवनी त्याची मूलाधार संस्था राहणार आहे.
 अनुराधाचं जग आणि जगणंच निराळं. तिनं आजवर अनेक प्रकारची कामं केली. मतदार जागृतीच्या तिनं केलेल्या कामामुळे भ्रष्टाचारी निवडणूक शुद्धतेकडे झुकली. कोल्हापुरात पैसे वाटणं राजरोस होतं... ते आडपडदे झालं. (थांबायला अजून बरंच थांबायला हवं!) मग तिनं एड्स जनजागृतीचं काम केलं. तिच्या कामाचा भर जागृती व जनसंगठन, त्याद्वारे ती शासन यंत्रणेस अक्षरश: गदागदा हलवते... घसा फुटेपर्यंत शासनाच्या कानी कपाळी ओरडत राहते... अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सुनावते... हे तुमचं काम आहे... पगार त्यासाठी आहे... अनुदान त्यासाठी असतं... मग जाग येते. तिनं बालमजूर प्रतिबंधाचं काम सुरू केलं. एक नाही, दोन नाही, चांगली ५००० मुलं... बालमजूर तिनं शाळेत पिटाळली... कधी आई-वडिलांना समजावून... कधी शिक्षकांना हाताशी धरून, तर कधी शासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरून. आता तर कोल्हापूर जिल्हा परिषदेनं तब्बल चौदा प्राथमिक शाळा केवळ बालमजुरांसाठी चालवल्यात आणि त्याही वीटभट्ट्यांच्या परिसरात. भीक नाही मागायची, हक्क मागायचा, असं ती स्थलांतरित कुटुंबांना, मुलांना समजावते. कामगार अधिकारी घेऊन छापे घालतात. होरपळणारं बाल्य, करपणारं बालपण हा तिच्या करुणेचा, क्रियामाणतेचा जिव्हाळ्याचा विषय... शासनाला त्यांचं काम समजावयाचे आणि करायला लावायचं... ऐकलं तर ठीक नाहीतर सरळ पोरं गोळा करते अन् शासनाच्या दारावर धडक मोर्चा काढते... आता जिल्हाधिकारी अनुराधा मोर्चा काढू नये म्हणून काळजी घेतात. दगडाला पाझर फुटतो, यावर तिचा विश्वास तेव्हा बसला जेव्हा ती 'त्या' सोशल शॉकनी कोसळली होती... तेव्हा तर तिनं आपल्या कामाच्या टेबलावर चांगला एक दगडगोटाच आणून ठेवला होता... प्रतीक म्हणून! या दगडाला आपण पाझर फोडायचा आहे, हे तिनं ठरवलेलं. आज मात्र टेबलावर तो दगड दिसत नाही!
 हे सगळं अनुराधा करू शकली ते प्रबळ इच्छाशक्ती व भक्कम लोकबळावर. प्रेमविवाह केला म्हणून तिचं घर, आई-वडील, नातलग दुरावले... लग्न

निराळं जग निराळी माणसं/१२५