पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांचं सांगणं असायचं. अनुराधाचे वडील बाबूराव नबाजी अमोलिक, आई अण्णाबाई. अनुराधाचा जन्म १९७२ चा. हरेगावलाच तिचं प्राथमिक शिक्षण झालं. इ. ५ वी पासून ती मिशनच्या वसतिगृहात राहून शिकली. मिशनच्या साहाय्यामुळे ती कॉलेज व उच्च शिक्षण घेऊ शकली. मुंबईच्या निर्मल निकेतनमधून एम.एस.डब्ल्यू. झाली. जळगावच्या जिल्हा परिषदेच्या जलसंधारण योजनेत सल्लागार म्हणून काम करू लागली. जनसंघटन, जनसहभाग व जनविकास ही त्या कामाची त्रिसूत्री होती. ती तिला भावली. ती त्रिसूत्रीच तिच्या आयुष्याची शिदोरी ठरली. ती तिथं रुळली; पण जळगावात झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे आई-वडील अस्वस्थ झाले. आपल्या तरण्याताठ्या मुलीला त्यांनी नोकरी सोडायला लावली ती काळजीनं. अनुराधाला ते अमान्य होतं; पण ती आज्ञाधारक. मग मिशनच्याच मदतीनं ती औरंगाबादला गेली. तिथं मिशनचा वडार समाजोत्थान प्रकल्प होता. तिथं ती काम करू लागली. तिथं तिची भेट दीपक भोसले नावाच्या तरुण प्राध्यापकाशी झाली. ती त्याच्या प्रेमात पडली ते समानशील समाज कार्यकर्ता म्हणून. ही महार, तो चांभार, सासरी जाच. ही खालच्या जातीची म्हणून; पण तरी ती सहन करत राहिली. कादंबरी जन्मली. पुढे ग्रंथ झाला. ग्रंथला घेऊन ती घरी आली. तर नवऱ्याच्या वागण्यात आणखीच बदल दिसला...एक दिवस तर घर आवरताना तिच्या हाती प्रेमपत्रं आली तशी ती कोसळली ...जाब विचारला तर मारहाण ठरलेली...आणि एक दिवस तिला घरातून बाहेर काढण्यात आलं. भारतीय समाज हा सत्चरित्र उपासक. इथं कुणाला उद्ध्वस्त करायचं, तर चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे...की काम फत्ते! अनुराधानं ठरवलं ...आपण समाज हक्काची लढाई करतो...व्यक्ती हक्काची का नाही? पोलीस ठाणे, कोर्टकचेऱ्या करून तिनं पोटगीसह घटस्फोट मिळविला व ती स्वतंत्र...स्वावलंबी झाली. तिनं मनात आणलं असतं तर सासरला जेरीला आणू शकली असती; पण तिनं एका क्षणी ठरवलं हक्क मिळवायचा; पण कुणाचं जीवन उद्ध्वस्त नाही करायचं. नवऱ्याच माप त्याच्या खिशात घालून ती मोकळी झाली.
 तिनं 'अवनी' या आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपलं घर वसवलं. आज तिथं तिच्या घरात ३५ मुलं-मुली आहेत. ते सर्व कधी काळी बालमजूर होते. कोण वीटभट्टीवर काम करायचा, कोण सेंट्रींगची काम करायची. नंदीवाले, डवरी, गोसावी, जोशी, मदारी अशा भटक्या कुटुंबातील बालमजूर मुलांना घेऊन अनुराधा राहते. अवनि बालगृह आहे. कोल्हापूरच्या राधानगरी रोडवरील जिवबानाना पार्कमध्ये. शासनमान्य संस्था; पण अनुदान नाही. अनुराधा ती लोकवर्गणीतून चालवते. इतके दिवस ती हे सर्व पै-पैसा जमवून करायची.

निराळं जग निराळी माणसं/१२४