पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याचा दुसरा वसंत ऐन फुलोऱ्यात होता...कळत होतं; पण वळत नव्हतं...एक दिवशी मी हात टेकले नि कादंबरीची क्षमा मागितली..."बेटा...मी आईबाबांना एकत्र नाही करू शकलो... मला क्षमा कर!" त्या क्षमेनं अनुराधाला समाजसेवक बनवलं. आजवर ती कर्मचारी होती...आता ती कार्यकर्ती झाली. सोशल शॉकनं झालेला तो एक कायाकल्प होता.
 तिची माझी ओळख १९९६-९७ च्या दरम्यानची. लोकसभा निवडणूक जाहीर झाली होती. ती आपल्या अवनी संस्थेतर्फे मतदार जागृतीचं काम करायची. त्यासाठी तिने एक पथनाट्य करायचं ठरवलं होतं. 'मतदार राजा जागा हो' आमच्या महावीर महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग होता. त्याचं तिला साहाय्य हवं होतं. या पथनाट्यासाठी तिने जी मुलं निवडली होती ती माझ्या हिंदी विषयाची. नियमित येणारे माझे विद्यार्थी अनियमित होऊ लागले. शोध घेता लक्षात आलं की, ती या पथनाट्यात आहेत. अनुराधामुळे माझी मुलं बिघडली म्हणून मी तिच्याकडे तक्रार केली तशी ती म्हटली, "सर, मी तुमचंच काम करतेय. तुम्ही म्हणाल तर बंद करते. मुलं शिकतील; पण समाज अडाणीच राहील." तिच्या या बिनतोड युक्तिवादापुढे मी काय बोलणार होतो? मी मौन संमती देऊन रिकामा झालो.
 पुढे ती आमच्या अनेक कार्यात ती दिसू लागली... भाग घेऊ लागली. मोलकरीण संघटना, बालमजूरविरोधी चळवळ, नरेंद्र महाराजविरोधी आंदोलन, महायज्ञ विरोध, शिक्षण हक्क परिषद सर्वांत तिचा हिरिरीनं सहभाग व पुढाकार असायचा. ती कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीतली फुलनदेवीच झाली होती. मोर्चात घोषणा देणं, मोर्चात लोक जमवणं, बालमजूरविरोधी धाडी घालणं अशा धडाडीच्या कामात ती पदर खोचून उभी असायची. अशी ही आमची आधुनिक रणरागिणी ताराराणी अचानक गप्प, भूमिगत झाल्यानं आम्ही सर्व कार्यकर्ते अस्वस्थ होतो...चौकशी करता समजलं की नवऱ्यानं तिला बाहेर काढलंय आणि ती ग्रंथ आणि कादंबरी या आपल्या दोन लेकरांसह स्वत:च्याच हक्कासाठी संघर्ष करतेय...आणि म्हणून गायब! आम्ही सर्व जण तिच्या पाठीशी राहिलो तरी तीच तिच्या पायावर उभी राहिली आणि उभी आहे.
 तिची उमेद व उभारी समजून घेताना लक्षात आलं... ती मूळची हरेगावची. हे गाव श्रीरामपूर तालुक्यातलं. तिचं कुटुंब मागासवर्गीय. आजोबा मोलमजुरी करून पोट भरायचे. महार असले तरी ढोरकाम करायचे. ते ख्रिश्चन मिशनरींच्या संपर्कात आले. त्यांनी धर्मांतर केलं. ख्रिश्चन झाले तसे 'माणूस' झाले, असं

निराळं जग निराळी माणसं/१२३