पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यासही आत्मकेंद्रित्वाची झालर आहे. सेवानिवृत्तांना समाजप्रवृत्त करायचं आव्हान वानप्रस्थांपुढे आहे. 'आपल्या प्रपंचाची कोंडी फोडून जो समाज प्रपंच आपला करतो तो वानप्रस्थ,' असं बाबा आमटे म्हणत. त्या दृष्टीनं ते 'उत्तरायण' चालवायचे. ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूरसारख्या देशांनी वृद्धांचे स्वर्ग निर्माण केलेत. तिथला वृद्ध गलितगात्र नाही; कारण तो 'राष्ट्रीय संपत्ती' (नॅशनल ऍसेट) म्हणून सांभाळला जातो. त्याचं शहाणपण, अनुभव राष्ट्र प्रगतीसाठी वापरले जाते. आपल्याकडे वानप्रस्थ एक समृद्ध अडगळ म्हणून वळचणीत ठेवण्याची समाज व शासनाची जी वृत्ती आहे, त्याचं फलित वृद्धाश्रम होतं, असं जेव्हा शिवाजी पाटोळेना वाटते तेव्हा ती विचार करायची गोष्ट आहे, हे लक्षात आल्यावाचून राहात नाही. समाजाची एक खिंड मी लढवीन, असा शिवाजीच्या आचरणातील आश्वासक, कृतिसंकल्प आपण पाहाल तेव्हा आपल्या निष्क्रिय जगण्याची, आत्मकेंद्री आयुष्याची शरम वाटल्याशिवाय राहत नाही.
 आपल्याला मुलांनी वृद्धाश्रमात टाकू नये, असं ज्यांना वाटतं त्यांनी गाडी आयुष्याच्या चढावर असताना स्लो मोशन चालवायचं कसब शिकायला हवं, तरच उतारही सुलभ होतो, हे शिवाजीचं सांगणं बरंच काही शिकवतं.

•••

निराळं जग निराळी माणसं/१२१