पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हॉटेलच्या मोरी कामावर होता. हॉटेलची मोरी असतो नरक...तुम्ही पाहिली नसेल तर भाग्यवान...हॉटेलचं सारं उष्टं धुवायचं ठिकाण...मोरीवर कप, बशा, प्लेटी, चमचे धुवायचं काम करणाऱ्या माणसास आठ तास पाण्यातच राहावं लागतं...हात पाय पाण्यानं अक्षरशः कुजतात...पांढरे होतात...चरबीसारखे...फटक नि गिळगिळीत...मोरीतून बाहेर आलं की तेव्हा पाच-सात रुपये हाती यायचे.
 आपल्या वाट्याला आलेला भोग इतरांच्या वाट्याला येऊ नये, असं एक दिवस त्याला वाटलं नि तो संत पदास पोहोचला. आपली पाच कोटी रुपयांची दोन एकर जमीन त्यानं वृद्धाश्रमास अर्पण केली... त्यावर एक दोन कोटीच्या चार पाच टोलेजंग इमारती त्यानं स्वत: प्लॅन, इस्टिमेट व एक्झिक्युशन करून उभारल्या. गवंड्याचा पोर असल्यानं त्याच्या इमारतीस आर्किटेक्ट नाही की इंजिनियर...समाज आश्रमात येणारे वृद्ध, त्यांचे नातेवाईक शिवाजीला मदत करतात...शिवाजी रोज एक वीट चढवत राहतो. आज दीडशे वृद्धांची सोय...उद्या ती तीनशे होणार...हा नुसता पसारा नाही. त्याला सेवेचं, कष्टाचं, समर्पणाचं अधिष्ठान आहे. शिवाजीची परीक्षा म्हणून मध्ये मी वृद्ध पाठवले...एक पै न घेता तो त्यांचा सांभाळ करतो.
 आता शिवाजी वृद्धांना अन्न, वस्त्र, निवाऱ्यापलीकडे डे केअर सेंटर, विरंगुळा, टिफिन सर्व्हिस, ऑन कॉल केअर अशा जपानच्या धर्तीवरील संस्थाबाह्य सेवा देण्याची उमेद बाळगून आहे. हाताला काम देणारं बेसिक एज्युकेशन द्यायचा त्याचा विचार आहे. अवघा एस.एस.सी. झालेला शिवाजी दिसायला, वागायला, बोलायला वेंधळा, साधा दिसला तरी त्याचे विचार, आचार अनावर खरे...तुम्ही 'अहो' म्हणा. तो 'काहो' म्हणून प्रतिसाद देईल...'अरे' म्हणाल तर 'कारे' ची त्यांची तयारी असते...पण आताशा साठीकडे झुकलेला...स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतलेला शिवाजी हा रुग्ण सेवेतला...विशेषतः ज्येष्ठांच्या जीवनाचा अघोषित डॉक्टर झालाय...बेडसोअर, कफ, झोप, भूक इ. वृद्धांच्या साऱ्या शारीरिक, मानसिक, भावनिक विकारांवर त्याच्याकडे प्रत्येकास लागू पडेल असे उतारे आहेत म्हणून शिवाजीकडे गलितगात्र होऊन आलेला वृद्ध काठी न घेता ताठ होतो. वृद्धांचा वाकलेला कणा सरळ करणारा शिवाजी आता समाजाचाच कणा झाला.
 वृद्धाश्रम हे काही समाजभूषण नव्हे. एकविसाव्या शतकाचं प्रथम दशक सरत असताना लक्षात येतं की, समाजात सध्या वृद्धांची फौज ज्येष्ठ नागरिक संघामार्फत आपलं उत्तरायुष्य आनंदी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. पण

निराळं जग निराळी माणसं/१२०