पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'मूल' होतात...आपण त्यांचे पालक व्हायला लागतं...त्यांची खरी भूक सोबत, बोलणं, प्रेम, सहवासाची असते...नेमकं त्या वेळी माणसं त्यांना अडगळीची खोली, टी.व्ही. वर्तमानपत्र देतात नि नामानिराळे होतात.
 शिवाजीला वृद्धांचं असं करावंसं का वाटलं, यालाही एक पार्श्वभूमी आहे. शिवाजीचे आजी-आजोबा मुंबईचे गिरणी कामगार. आई-वडील गवंडी काम करायचे. शिवाजी पाच महिन्यांचा असताना वडिलांचं अपघाती निधन झालं. ते मल्ल, लाठी-काठी चालवायचे. तेव्हा शाहू महाराजांच्या आश्रयाने तालमी फुलत होत्या. वडील तुकाराम पाटोळे समाज कार्यकर्ते. यांनी स्वश्रमातून पाचगाव, नंगीवलीसारख्या तालमी बांधल्या आणि लोकार्पण केल्या. त्यांच्या अकाली निधनानंतर सहा मुलांचं कुटुंब घेऊन जगणं विधवा आईला शक्य नव्हतं. आधाराला नवऱ्याला डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाची ४०० रुपयांची पेन्शन व पाच एकर नापीक जमीन होती. गिरणीचं पडलेलं पीठ गोळा करून माउलीनं मुलं जगवली. गोळा केलेल्या पिठातून सातवी भाकरी केली. तर माउलीला घासभर खायला मिळायचं. कधी कधी समोरच्या आमच्या रिमांड होममध्ये उरलेल्या भाकरीचा काला (चिवडा) खायला मिळाला की, ही पोरं ढेकर द्यायची.
 रिमांड होमची मुलं, समोरच्या रेसकोर्सच्या शेतातले कैदी आणि पलीकडेच आर्य समाजाच्या वसतिगृहातले हरिजन विद्यार्थी या साऱ्यात शिवाजीचं बालपण तारुण्य फुलत होतं. डी.टी. मालक (अपराध), भालजी पेंढारकर यांसारखी मंडळी या सर्व अनाथ, निराधारांचं काहीबाही करत असलेलं शिवाजी पाहत असे. आपण असं काही करावं, असं वाटत असताना तो पेठेतल्या टोळक्यात कधी सामील झाला ते त्याचं त्यालाच समजलं नाही.

प्रॅक्टिस क्लबच्या फुटबॉल टीममधून तो खेळत कुस्तीत कमावेली रग जिरवत होता. पण ती जिरत नव्हती. मग पेठेतल्या मारामारीत तो पुढे असायचा. त्याच्या नावातच 'शिवाजी' असल्यानं त्यानं तलवारीनं कुणाला कंठस्नान जरी घातलं नसलं तरी अनेकांना जायबंद केलं होतं...मग तो एकदा जेरबंदही झाला अन् त्याचं आयुष्य बदललं...आपण लहानपणी जे व्हायचं नाही म्हणायचो, तेच झाल्याच्या पश्चात्तापानं त्याला वाल्मीकी करून टाकलं...तो एकदम अहिंसक, सत्शील, सभ्य झाला नि गुजराती हायस्कूलमध्ये शिपाई होऊन समाजाचा सरसेनापती व्हायचं स्वप्न पाहू लागला. आज ते स्वप्न एक समाज वास्तव बनून तुमच्या पुढे आहे.
 हा दिवस आपोआप आला नाही. शिवाजीनं त्यासाठी भरपूर खस्ता, टक्के-टोणपे खाल्ले. त्याचा मी साक्षीदार आहे. काही काळ शिवाजी आहार

निराळं जग निराळी माणसं/११९