पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणे!). आत्मभानास अहंकारानं हरवण्याचा समाजात लपंडाव सुरू असताना पवन ज्या संयमानं आपलं जीवन कार्य तळहातावर घेऊन रोज एक एक खिंड लढवतो...ती नक्कीच अनुकरणीय गोष्ट आहे. त्याच्या मोठेपणाची एकच खुण मी सांगेन. त्याच्या शाळेस अनेक पुरस्कार मिळाले...त्याला मात्र एकही नाही...'मी' नाही 'आम्ही' असं असिधारा व्रत स्वीकारण्यातूनच हे येऊ शकतं! 'नित्य संयमी तो एक योगी' असं योग्याचं सांगितलेलं लक्षण. हाच तो एक लक्ष्मण पुरुष! आपपराची लक्ष्मणरेषा ओळखलेला...पाळणारा...सांभाळणारा त्याचा स्वत:चा बायोडाटा नाही, व्हिजिटींग कार्ड नाही...आहे ते शाळेचं माहितीपत्र नि कागदपत्रे! शाळेत सर्वत्र शिक्षणाच्या खुणा भरलेल्या...प्रत्येक मुलांना दिशा, प्रेरणा देणारा ...कार्यक्रम एकही नाही. 'नो प्रोग्राम...फंक्शन (कार्य) ओन्ली' असा दिनक्रम असलेली शाळा...पवन पगार घेत असला तरी त्याचं कार्य पगारी नाही...समस्त पगारी शिक्षकांनी शिकावं असं समर्पण चेतनाची मुलं नित्य स्मितहास्य करणारी, चैतन्यशील, स्वावलंबी. हे असतं पवनच्या कार्याचं प्रतिबिंब व प्रमाणपत्रही! कार्य हेच ध्येय असलेल्या माणसास पुरस्कार, सन्मानपत्राचं वैयर्थ चांगलं समजतं. प्राचार्य पवन खेबूडकर व चेतना मतिमंद विद्यालय म्हणजे व्यक्तीला लाभलेलं समाजभूषण.

•••

निराळं जग निराळी माणसं/११०