पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केंद्र, वाचा उपचार केंद्र, समुपदेशन केंद्र, जन्मोत्तर निदान केंद्र (अर्ली डिटेक्शन सेंटर) संस्कृती केंद्र, क्रीडांगण, शाळा, उद्योग विभाग, वसतिगृह इ. शाळेची अनेक स्वप्नं आहेत. समाज पैसे द्यायला तयार आहे. शासनास फक्त जागाच द्यायची आहे.
 चेतनास ही मदत का केली पाहिजे हे ज्यांना समजून घ्यायचं आहे त्यांनी आमचा विद्यार्थी व महाराष्ट्रातला सिने दिग्दर्शक, नाटककार अभिराम भडकमकर लिखित 'आम्ही असू लाडके' हा चित्रपट आवर्जून पहावा. मी व माझ्या कॉलेजच्या दोन हजार विद्यार्थ्यांनी तो पाहिला आहे. मतिमंद बालके त्यांचे भावविश्व, भविष्य पाहता ते समाज संधी व सुविधांचे 'पहिले हक्कदार' आहेत हे आपण केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे. सामाजिक न्यायाची खरी सुरुवात मित्रांनो जाती, धर्म, लिंग, भाषेपेक्षा किती तरी आधी माणसातील जन्मगत कमतरतेपासून सुरू होते हे आपण अभिनिवेशात विसरूनच गेलो आहोत. अनाथ, अंध, अपंग, मतिमंदांपासून सामाजिक नैसर्गिक न्याय सुरू व्हायला हवा...त्यांचीच अक्षम्य उपेक्षा याचं पवन खेबूडकरांना वाटणारं वैषम्य...शल्य हे समाजाचं खुपतं दु:ख व्हायला हवं!
 पवन खेबूडकर प्राचार्य म्हणून या मुलांचं जे करतात...विचार करतात, ते विदेशात असते तर एव्हाना जगातलं आदर्श शिक्षण केंद्र उभारलं असतं. मी १९९० साली युरोपात असताना पॅरिसमध्ये आठवडाभरापेक्षा जास्त दिवस होतो. त्या काळात तेथील एक चेतनासारखी मतिमंद शाळा पाहिली होती. नंतर १९९६ साली जपानमध्ये अशा शाळा पाहिल्या, परवा जानेवारीत थायलंड, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशियामधील अशा संस्था पाहिल्या... 'चेतना'मध्ये जी जाणीव, धडपड, दृष्टी आहे ती तिथे नाही आढळली...भौतिकांनी मित्रांनो समृद्धी नाही येत. खरं वैभव असतं ते एखाद्या प्रश्नाविषयी तुमचा संवेदी सूचकांक किती? यावर.
 या कसोटीवर प्राचार्य पवन खेबूडकर व चेतना विद्यालयाचे अद्वैत मला नेहमीच उजवं वाटत आलंय. एखादी संस्था 'घर' वाटणं वा एखादी शाळा 'व्यक्ती विकास केंद्र' वाटणं ही सहज होणारी गोष्ट नसते! संस्थेचे समूह बळ असलं तरी एका व्यक्तीच्या संपूर्ण समर्पणाशिवाय तुमच्या हाती समाज वा माणूस बदलाच्या खुणा येत नसतात. प्राचार्य पवन खेबूडकर हे मितभाषी गृहस्थ होतं. त्यांच्यात मी एक गंभीर, अप्रसिद्ध समर्पित कार्यकर्ता पाहात आलो आहे. 'मी' हा शब्द त्यांच्याकडून कधीच ऐकल्याचं आठवत नाही. मला समाजकार्यातली ती मोठी डिग्री वाटत आली आहे. पंचवीस वर्षांच्या सातत्यपूर्ण कार्यानं माणसात अहंकार येतो (माझ्यात पण तो आला होता

निराळं जग निराळी माणसं/१०९