पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चान्स बनतं, कधी चमत्कार, तर कधी कला नि करिश्मा अशा आशयाची एक सुंदर हिंदी लघुकथा आहे. या पार्श्वभूमीवर जी माणसं जगणंच कलात्मक बनवतात त्यामागे त्या माणसाचा जाणिवेचा सहावा कोपरा (सिक्स्थ सेंस) विलक्षण असणं कारण असतं. पवन खेबूडकर उत्तम अभिनेते आहेत. त्यांची 'राशोमान', 'ऑथेल्लो', 'किंग लिअर' ही नाटकं मी पाहिलीत...चेतना मतिमंद विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात, संस्थेच्या छोट्या मोठ्या समारंभात, दरवर्षी होणाऱ्या हेलन केलर जयंतीत या माणसांचं कलासक्त जीवन लक्षात येत राहिलेलं...तर एकदा ते 'राशोमान' नाटकाच्या प्रयोगासाठी म्हणून सोलापूरला गेले होते. तेव्हा त्यांची नाटक मंडळी सोलापूरच्या नव्या पेठेतील एका कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या 'जिव्हाळा' या मतिमंदांच्या शाळेत उतरली होती. आमचे मित्र अण्णा राजमाने ती चालवत. पवन खेबूडकरांनी ती शाळा पाहिली नि ते खूपच अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे एक सक्षम, सशक्त समाज मन असल्यानं मुलांसाठी काही करावं असं आत खोलवर सतत वाटत रहायचं...या शाळेनं त्यांना वाट दाखवली. पवन खेबूडकरांनी आपले मित्र अजित देशपांडे, डॉ. शरद नावरे, डॉ. शरद भुताडिया, डॉ. विजय कर्नाड, डॉ. सुनील पाटील, दिलीप बापट या आपल्या अनेक सहकाऱ्यांसह गेल्या २५ वर्षांत केलेले कार्य त्यांच्या जागत्या मनाचा पुरावा.
 पवननी अवघ्या २० मुलांनिशी सुरू केलेली चेतना अपंगमती विकास संस्था केवळ मतिमंदांची शाळा नाही. ते मतिमंदाविषयी समाजास भावसाक्षर करणारं कृतीकेंद्र आहे. ते समाजास समजावतं की मतिमंदत्व हा आजार किंवा रोग नाही. ते केवळ बौद्धिक अपंगत्व आहे. ते उपचारांनी दूर करता आलं नाही तरी कमी करता येतं. मतिमंदांना शिक्षण, प्रशिक्षण, उपचारांनी स्वावलंबी बनवता येतं. त्यासाठी समाज, पालक, शासनाची कृतिशील भागिदारी लागते. इथं या शाळेत दिलं जातं जीवन शिक्षण, जगण्याचं बळ देणारी ही शाळा औपचारिक शिक्षणाबरोबर (अंकज्ञान, अक्षरज्ञान) व्यावसायिक प्रशिक्षण, कौशल्य विकसित करते. या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जो आटापिटा करते तो थक्क करून सोडणारा. ही शाळा या मुला-मुलींसाठी शाळेव्यतिरिक्त बाजार भरवते, उद्योग केंद्र, क्रीडा केंद्र, उपहार केंद्र चालवते. सहली, पालक मेळावे, प्रदर्शन भरवते. चित्रकला, शिल्पकला, नृत्य, हस्तकला शिकवते. मोठमोठी माणसं मुलांसमोर उभी करून आम्ही तुमच्याबरोबर आहोत असा धीर व दिलासा देते. मतिमंद, मूकबधीर, अंधांच्या कितीतरी शाळा शासकीय

निराळं जग निराळी माणसं/१०७