पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मतिमंदांना 'माणूस' बनवणारा शिक्षक : पवन खेबूडकर

 माणूस स्वभोगाच्या वेदनेचे उदात्तीकरण म्हणून जेव्हा एखादे कार्य करतो, ते श्रेष्ठ असलं तरी त्यास स्वत्वाची एक डूब असते; पण आपण अनाथ, अपंग, मतिमंद, अंध, विधवा, परित्यक्ता नाही; पण तशा समाजासाठी जेव्हा एखादी व्यक्ती अथवा समूह, त्या त्या वर्ग कल्याण अथवा विकासाचे, संगोपन, शिक्षण, पुनर्वसनाचे कार्य करतात तेव्हा ते प्रथम सांगितलेल्या कार्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ असते. परकाया प्रवेश, परदु:ख सहिष्णुता, सहवेदना, समवेदना संवेदनशीलतेशिवाय शक्य नसते. त्यासाठी स्वत:च्या पलीकडे पहाण्याची उदारता लागते. शिवाय दिसणाच्या जगाकडे विशिष्ट दृष्टी वा भावांनी पहाण्याची व्यापकता तुमच्या ठायी असायला लागते. माझे स्नेही पवन खेबूडकरांनी कोल्हापूर जिल्ह्यात १९८६ साली जिल्ह्यातील पहिली मतिमंद बालकांची शाळा सुरू केली ती माझ्या घराशेजारच्या एका छोट्या गॅरेजमध्ये. मी त्यावेळी अनाथ मुलांच्या संगोपन व पुनर्वसनाचे कार्य करायचो. तेव्हा मला या गोष्टीचं विलक्षण आश्चर्य वाटलं होतं. स्वतः मतिमंद नाही, घरी कोणी मतिमंद नाही तरी अशा मुलांबद्दलचा कळवळा आणि कळकळ का?
 हे मी समजून घेताना माझ्या लक्षात आलं की पवन २५ वर्षांचा तरुण पदवीधर. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चांगल्या पदावर कायम नोकरी. ती सोडून हे खूळ त्याच्या डोक्यात कसं भरलं याचं मला राहून राहून आश्चर्य वाटायचं. माणसाचं जीवन कधी, कोणत्या घटनेनं बदललेलं सांगता येत नाही. अगदी मृत्यूच्या दाढेत असलेला मनुष्य...त्याचं येणारं मरण कधी

निराळं जग निराळी माणसं/१०६