पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मंगलाताई मला १९८० साली प्रथम भेटल्या. मी पीएच.डी.झाल्यामुळे मला लहानाचं मोठं करणाऱ्या पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमानं आपल्या कार्य प्रवासाच्या शतकोत्तर काळातला पहिला डॉक्टरेट म्हणून माझा सत्कार ठेवला होता... त्यात पंढरपूरची अनेक समाजशील माणसं आली होती. त्यात मंगलाताई होत्या...बालकाश्रमात खाऊ वाट, मुलींशी खेळ, मुलांशी बोल अशी त्यांची चळवळ सुरू होती. हा पाझर त्यांनी साने गुरुजींच्या 'श्यामची आई'कडून घेतला होता. हे जरी खरं असलं तरी जन्मतः जागता उमाळा त्यांच्यात होताच! सामाजिक काम उसन्या शिदोरीनं कधीच होत नसतं...आत आत धुमारे सतत पेटत असावे लागतात. तेव्हाच कुठे ठिणग्या तग धरतात. सामाजिक कामाच्या या लुटूपुटूच्या लढाईनं त्यांचं समाधान होत नव्हतं. त्या अस्वस्थ काळात मला त्या प्रथम भेटल्या होत्या.
 मग सासू-सासऱ्यांना समजावून त्या स्वतंत्र झाल्या. या स्वातंत्र्याने त्यांना 'थेंबातही आभाळ असतं' हे खोटं असतं असं समजावलं. आपण मूलभूत स्वरूपाचं, जगावेगळं, निराळं केलं पाहिजे, अशा ओढीनं त्या कुष्ठ पीडितांसाठी काही करू लागल्या. पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर, गोपाळपूर, गाणगापूर अशा तीर्थस्थानी एक सोय असते...समाजास जे नको असतं त्याचं विसर्जन कुंड असतात ही तीर्थक्षेत्रं! या विसर्जन कुंडात 'निर्माल्य' अशा गोंडस नावाखाली सारी घाण टाकून समाज 'निर्मळ' (खरं तर नामानिराळा) होत असतो. त्याला नदीच्या प्रदूषणाची जशी पर्वा नसते तशी समाजप्रदूषणाचीही! हे लक्षात घेऊन त्या कुष्ठपीडितांच्या वस्तीत जाऊ लागल्या. काही देऊ लागल्या. देता देता त्यांच्या लक्षात आलं की, आपलं हे देणं त्यांची गरज भागवतं. हे जरी खरं असलं तरी ते त्यांना लाचार याचक बनवतं. उभारणीचे काही करावं म्हणून त्यांनी मग वाचनालय सुरू केलं...ते काम त्यांना वरवरचं, मलमपट्टीचं वाटत राहिल. हा काळ १९८५ चा होता.
 या दरम्यान अभ्यास, निरीक्षण, समाज प्रश्नांचं भान म्हणून त्यांनी मिळेल ती सामाजिक कामं पाहिली...प्रत्येक काम करावंसं वाटण्याचा तो भाबडा काळ होता. असंच एकदा त्या पुण्याला गेल्या. जाण्यापूर्वी त्यांनी विजयताई लवाटे यांच्या वेश्या नि त्यांच्या मुलांच्या संगोपन, पुनर्वसनाच्या कामाबद्दल ऐकलं, वाचलं होतं. अनेक अन्य कामांपेक्षा हे काम त्यांना निराळं नि आव्हानात्मक वाटलं... पुण्यातली बुधवार पेठ पाहात असताना त्या पेठेत त्यांना पंढरपूरच्या संत पेठेतील वेश्यावस्तीचं प्रतिबिंब दिसू लागलं...खुणावू लागलं. विजयाताईंनी काम सुरू केलं तेव्हा तो काळ एकदम प्रतिकूल होता...आता करणं सोपं होतं; कारण शासन, समाजास त्यांचं महत्त्व पटलं होतं. १९९५ च्या दरम्यान त्यांनी

निराळं जग निराळी माणसं/१०२