पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निर्माल्य समाजाची निर्मला : मंगला शहा

 'अस्पृश्यता हा मानव जातीला लागलेला कलंक आहे', असे महात्मा गांधी म्हणत. ही गोष्ट विसाव्या शतकात ठीक होती. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. गावकुसाबाहेर राहणारं जग आता गावात आलंय; पण समाजमनातली अस्पृश्यता गेली असं नाही म्हणता येणार. अस्पृश्यता ही जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत या पलीकडची एक मानसिकता आहे. तिचा उगम माणसाच्या अहंकारात आहे. अहंकार उच्च- नीचता जन्माला घालतो. मी कोणी तरी आहे, या अस्तित्वभानाने सुरू झालेला हा माणसाचा प्रवास मी कोणीतरी 'विशेष' आहे, या अस्मितेपर्यंत येऊन पोहोचतो. अन् मग फक्त 'तू तू मी मी' असा भेदभाव जन्मतो. एकविसावं शतक मानव प्रतिष्ठेचं मानलं जात असलं, तरी तिकडे सीमाभागात बेळगावसारख्या शहरात इव्हान लोमेक्ससारखी समाजहृदयी रस्त्यावरच्या एड्सग्रस्तांना स्वत:च्या घरी सांभाळते. घरात अडचण होते म्हणून तिथल्या कॅम्पातल्या एका कॉलनीत त्यांच्यासाठी पदरमोड करून घर बांधू लागते, तेव्हा 'गावभरचा उकिरडा आमच्या...कॉलनीत नको' म्हणणारे मी जेव्हा पाहतो...किंवा पंढरपूरला एड्सग्रस्त माता व मुलांसाठी मंगला शहा गाताडे कॉलनीत आपल्या आई-वडिलांची स्मृती म्हणून 'प्रभाहिरा प्रतिष्ठान' मार्फत समाजमनात स्पृश्यतेची पालवी फुटावी या ध्यासानं घरकुल उभारण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्यांनाही बेळगावचाच संवाद ऐकावा लागतो. मानव सभ्यता विकासाचा प्रवास अजून दूरचाच पल्ला आहे खरा! इथे, तिथं, सर्वत्र!

निराळं जग निराळी माणसं/१०१