पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्तमानपत्रात लेख लिहितो. दिवाळी-ख्रिसमसच्या दरम्यान निधी जमवतो...एक लाख रुपये बेळगावमध्ये समारंभपूर्वक देतो...पत्रकार परिषद होते...परत तेच प्रश्न, त्याच शंका. आम्ही फक्त एकच विचारतो, "तुम्ही काम पाहिलं का? अंधारात गोळ्या किती मारणार?" मग सगळे निरुत्तर होतात.
 इव्हान आता मदर इव्हान लोमेक्स झाली आहे...'डॉ. रेमंड लोमेक्स होम फॉर होमलेस' साकारलंय...तिथं १५-२० गरजू (आता ते बेवारशी नाहीत) सुखानं पाठ टेकतात. आता पोलिसांचा दंडुका नाही, अमानुष बलात्कार नाही...आहे ते हक्काचं घर, 'माणूस' म्हणून वागणारं, जगवणारं घर...मदर ही पदवी तिला कोण्या चर्चनं बहाल केली नाही...गरजवंतांची ती आहे आर्त पुकार! ती एक हाक आहे. जिला सतत ‘ओऽऽ' चं वरदान! आता मदर इव्हान लोमेक्स बेळगावची सेलिब्रिटी झालीय...स्टुडिओचं उद्घाटन, रोटरी कॉन्फरन्स, सायन्स कन्व्हेक्शन, शाळांचं स्नेहसंमेलन सर्वांत तिची उपस्थिती आता सर्वांना आवश्यकच नाहीतर अनिवार्य वाटते...मराठा लाइट इन्फंट्रीचे जवान आपलं मूठ-मूठ भर राशन वाचवतात...अन् इव्हानचं महिन्याचं राशन भरून जातात ...
 इव्हाननं या बांधवांना घर दिलंय...स्वतः मात्र अजून भाड्याच्या त्या आउट हाउसमध्येच आहे तशी राहते आहे...इव्हानचं निराळं जग मी पाहिलं आणि मला नवी जाग, नवी जाण आली. मी इव्हानला समजून घेतो, तेव्हा लक्षात येतं की, दुसऱ्याचं निरपेक्षपणे करणं, दुसऱ्याचं निरपेक्ष आतून बाहेरून एक होणे हे येरागबाळ्याचं काम नाही. कोडग्या, गोठलेल्या, निबर मनाच्या या समाजात एकविसाव्या शतकात म्हणून तर कोण दुसऱ्यासाठी करतं, यावर विश्वास राहात नाही. असं असलं तरी हे तितकंच खरं...समाज साकळलेला आहे खरा; पण अजून सारं संपलं- सरल्याचं भय नाही...नसतील झरे खळाळत वाहणारे; पण संवेदना- आपलेपणाचे उमाळे आहेत. उद्या त्यांचा समुद्र खचितच होईल!
 बेळगावी जातो तेव्हा माझा एक कार्यक्रम ठरलेला असतो...इव्हानला भेटायचं...माझे हात प्रत्येक वेळी भरलेले असतात असं नाही...मी भेटतो...तिला दिलासा मिळतो...उमेद मिळते...आपण एकटे नाही, याची जाणीव देणारी ती भेट...ती पण निरिच्छपणे जगत असते...म्हणत असते, आय ऍम डुइंग माय जॉब! फिनिश!!...
 मग मीही अधिक निरिच्छ, निरपेक्ष अन् खरं तर 'नॉन-एन्टिटीकडं जाणारा प्रवास करत राहतो...ती एका नव्या, निराळ्या जगाची निर्मितीच असते.'

•••

निराळं जग निराळी माणसं/१००