पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दरम्यानला तिला दिवस जातात...डॉक्टरांचा विरोध असताना ती बाळाला जन्म देते...मला आई व्हायचंय म्हणून! मुलीला जन्म देते. तिचं नाव इडन ठेवते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे इडन मतिमंद...मंगोल...आज वय वर्ष २५ पण अवघी चार फुटांची...आईभोवती पिंगा घालत, घुटमळत असते, तेव्हा इव्हानही मातृत्वाचं घेरदार नृत्य करत असते...तिला सोबत असते ऐंशी ओलांडलेली आजी...ग्रँडमा पामेला...हे सारं कमी म्हणून इव्हान कुणीतरी तिच्या दारात टाकलेल्या अनौरस रेणुकाचाही सांभाळ करत राहते, ते पोटच्या इडनप्रमाणेच...हे सारं येशूच्या प्रेरणेनं घडतं. अशी तिची अविचल श्रद्धा!
 वडिलांप्रमाणे डॉ. रेमंड लोमेक्स अचानक निवर्ततात...'हेचि माझे पंढरपूर' म्हणत ती गोव्याहून परत बेळगावी येते...सुटलेली नोकरी परत मिळत नाही... कशी तरी गुजराण करत असताना अचानक टपालातून तेवीस हजारांचा चेक येतो...ती असते डॉ. रेमंड लोमेक्स यांची ग्रॅच्युइटी...डॉ. रेमंड लोमेक्सनी वारस म्हणून इव्हानचं नाव नोंदलेलं होतं ...ती त्याची एकमेव वारस ठरली होती. इतके पैसे एकत्र बघण्याचा तिच्या आयुष्यातील तो पहिलाच प्रसंग!...आनंदानं ती गोड सांजा बनवते व बेळगावच्या रस्त्यावरील बेवारसांना वाटते...स्टँड, स्टेशन, कँप, कॉलेज रोड, किर्लोस्कर रोड, मिळेल तिथे वाटत फिरते...अंध, वेडे, मुके, रोगी, कुष्ठ साऱ्यात तिला येशू हसताना दिसतो, अन् ती येशूला हसत ठेवायचं ठरवून टाकते.
 आता रोज संध्याकाळी हे सगळे इव्हानची वाट पाहात राहतात... सांजा वाटताना तिच्या लक्षात येतं, कुणाला खोक पडली आहे...कुणाला बेडसोअर झालेत...कुणाला स्कूटरने धडक दिली आहे...कुणाच्या पाठीवर पोलिसांचा दंडुका पडलाय...तो विव्हळतो...कळवळतो आहे...कुणावर रात्री वेडी म्हणून कुणी तरी अज्ञातांनी बलात्कार केलाय... वस्त्रांचं भान नसलेली ती...रक्त वाहतंय...माणसांच्या बेटावर तिला अमानुषतेची नदी वाहताना दिसली अन् तिनं त्यांची मदर व्हायचं ठरवून एकेकाला घरी न्यायला सुरुवात केली.
 ती भाड्याच्या घरात एका आऊट हाउसमध्ये राहायची ...आता इव्हानला वेडं ठरवलं जाऊ लागलं...घर सोडायचा तगादा सुरू झाला, तसा तिनं कँपातल्या गणेशपुरमध्ये एक प्लॉट घेतला...ती बेवारशी लोकांसाठी आधारगृह बांधणार म्हटल्यावर कॉलनीचा विरोध होतो...तरी ती हिंमत हरत नाही ...याला भेट, त्याला भेट करत असताना तिची नि आमची गाठ पडते, ती आमच्या सहकारी डॉक्टर जया नातू यांच्यामुळे ...आम्ही इव्हानच्या मागे उभे राहतो. तिला एक मोठा 'मंगल पुरस्कार' देतो...जंगी सत्कार घडवून आणतो...

निराळं जग निराळी माणसं/९९