________________
पुनरुक्ती आवश्यक वाटते. कीर्तनकारही त्याच्या काळातील लोकशिक्षकच होता. १९१७ मध्ये नाट्यपरिषदेच्या अधिवेशनात अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणात खाडिलकरांनी 'जुने प्रवचनकार, पुराणिक, कीर्तनकार आणि नवे नाटककार यांचे कार्य एकाच प्रकारचे - रंजनाद्वारे लोकशिक्षणाचे आहे,' असे आग्रहाने प्रतिपादन केले आहे. वृत्तपत्र ही त्याच मालिकेत बसणारी त्या युगातील एक नवीन संस्था होती. सर्वांचे कार्य एकच असते, अपेक्षित परिणाम करण्यासाठी पुनरुक्ती करणे. तिच्यात आकर्षक लयबद्ध ठसकेबाजपणा आल्यास अधिक प्रभाव पडतो. खाडिलकरांना हे तंत्र उत्तम अवगत असल्याने त्यांच्या गद्यालाही वक्तृत्वाची लय आणि ठसका आहे. केवळ विशिष्ट शब्दांच्या विशिष्ट पद्धतीच्या उच्चारातून अपेक्षित परिणाम साधण्याची ही प्रक्रिया एकपरीने यातुश्रद्धावस्थेतील मंत्रपरिणामाचा सहज राहिलेला अवशेष म्हणावा लागेल. ताललयबद्धतेचे आकर्षण हीच एक नैसर्गिक ‘किमया' आहे. यातुविधीतील मंत्राच्या पालुपदाचे ठरावीकपणे होणारे सामूहिक पुनरुच्चारण ( आवर्तन) जो परिणाम घडवते, त्या प्रकारे ठरावीक वाक्यांशाचे पुनरुच्चारण प्रेक्षकांवर एक 'मायिक' परिणाम घडवण्यास उपकारक ठरते. सं० विद्याहरण: १९१३ 'कीचकवध' हे जसे खाडिलकरांचे पहिले पौराणिक गद्य नाटक, तसे 'विद्या- हरण' हे त्यांचे पहिले पौराणिक संगीत नाटक! एकुणात पौराणिक नाटक दुसरे, पण संगीत असलेले पहिले पौराणिक नाटक 'विद्याहरणच!' तत्पूर्वी 'संगीत मानापमान' (१९१०) रंगभूमीवर आले आहे; परंतु ते काल्पनिक नाटक आहे. खाडिलकर १८९३-९४ पासून नाट्यलेखनाला प्रारंभ करतात. १९१३ पर्यंत खाडिलकरांची एकूण सहा नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. त्यापैकी पाच गद्य नाटके आहेत. एक समर्थ गद्य नाटककार म्हणून ते उमेदीत आहेत. पहिल्याच 'संगीत मानापमान'ने (१९१०) त्यांना चांगले यश दिले आहे आणि ते सव्यसाची नाटककार म्हणून मान्यता पावले आहेत. अशा वेळी 'संगीत विद्याहरण' हे नाटक रंगभूमीवर येते. 'सं० विद्याहरण' (१९१३) हे खाडिलकरांचे सर्वश्रेष्ठ नाटक मानण्याचा सर्व- साधारणपणे रिवाज आहे. हे पौराणिक नाटक; पौराणिक नाटकाच्या लेखकाचे काम एकपरीने सोपे, पण दुसऱ्या बाजूने कठीण असते. बदलत्या जीवनमूल्यांच्या सरणीनुसार श्रद्धास्वरूप बदलते वा पूर्ण नाहीसेही होऊ शकते. पुराणकथा तीच असते. या पुराणकथेतून भूत वर्तमान भविष्याची स्थिर मूल्ये शोधणे हे कठीण काम आहे. अनेकदा पुराणकथातील स्थिर घटिते आणि स्थिर (स्टॅटिक) व्यक्तिरेखा नाटककार खाडिलकर / ८७