Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तो होतो. एक समर्थ कलाकृती म्हणून त्यापलीकडे या नाटकांचे काही सामर्थ्य आहे का, याचा विचार खोलात जाऊन फारसा होत नाही, असे वाटते. किर्लोस्कर, देवल आणि खाडिलकर यांच्या नाट्यलेखन-प्रकृतीमधील तुलना श्री० वा० ल० कुलकर्णी यांनी अचूकपणे केली आहे. किर्लोस्कर देवल यांची नाटके मुख्यतः संस्कृत नाट्यसाहित्यावर आधारलेली होती. त्यांचे नाट्यलेखन तंत्रही संस्कृत नाट्याला अनुसरणारे होते. त्यांची कथानके पौराणिकच होती. संस्कृत नाट्यकथानकांप्रमाणे ती एकपदरी आणि एका सरळ रेषेत जाणारी होती. उपकथानकांची जोड दोघेही देत नव्हते. केवळ पुराणकथेला नाटकाचा साज देण्याची हातोटी कौतुकास्पद होती. त्यांच्या पात्रांची भाषा नाट्यानुकूल होती. खटकेबाज परंतु अकृत्रिम (अनेकदा घरगुती बोलीभाषाच ) होती. महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विशेषतः किर्लोस्कर यांची पदे हा नाट्यसंवादाचाच एक भाग होता आणि रसपरिपोषक अर्थही त्यात होता. पद हे नाटकाचा अपरिहार्य भाग म्हणून येत होते. या पार्श्वभूमीवर खाडिलकर नाट्यलेखनाला प्रारंभ करत आहेत. खाडिलकर आपल्या नाट्यलेखनाला प्रारंभच मुळी एका गद्य नाटकाने करतात. खाडिलकरांचे पहिले लिखित नाटक 'सवाई माधवरावाचा मृत्यू' (१८९३) हे ऐतिहासिक गद्य नाटक आहे; मात्र प्रयोगदृष्ट्या पहिले आणि लेखनदृष्ट्या दुसरे नाटक 'कांचनगडची मोहना' (१८९८) हे आहे. ही दोन्ही गद्य नाटके आहेत. त्यांचे तिसरे नाटक ‘कीचकवध' (१९०७) मात्र पौराणिक कथेवरचे, परंतु पुन्हा गद्य नाटक आहे. त्यानंतर पुन्हा एक ऐतिहासिक ' भाऊबंदकी' (१९०९) आणि 'प्रेमध्वज' (१९१०) हे काहीसे कल्पनाप्रधान, अशी गद्य नाटके लिहून १९१३ मध्ये 'संगीत विद्याहरण' हे पहिले संगीत पौराणिक नाटक लिहिले आहे. त्यापूर्वीच्या नाटकांपेक्षा ‘कीचकवध', 'भाऊबंदकी', 'सवाई माधवरावांचा मृत्यू या गद्य नाटकांनीच खाडिलकरांना प्रसिद्धीच्या झोतात आणले होते. नाटककार म्हणून त्यांचा ठसा मराठी नाट्यसृष्टीवर उमटलेला होता. त्यांच्या नाट्यरचनेची स्वतंत्र वृत्ती परिचित झाली होती आणि निरनिराळ्या कारणांनी त्यांच्या या तीनही नाटकांची चर्चाही भरपूर झालेली होती. 'गद्य नाटककार' म्हणूनच खाडिलकर हे नाट्यक्षेत्रात स्थिर झालेले होते. संगीत नाटकाच्या प्रभावकाळात एक यशस्वी गद्य नाटककार म्हणून खाडिलकरांनी आपली स्वतंत्र मुद्रा उमटविली, हे खाडिलकरांचे स्वतःचे अर्जित आहे. खाडिलकरांनी 'सं० विद्याहरण' (१९१३) नंतरही संगीत नाटके लिहिली. ती गाजलीही खूप; किंबहुना संगीत नाटकांची परंपरा म्हटले की, किर्लोस्करांच्या 'शाकुंतल', 'सौभद्र' नंतर खाडिलकरांचे 'संगीत मानापमान' व 'सं० स्वयंवर' ७० नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर