________________
न० चिं० केळकरांचे 'गतगोष्टी' हे आत्मचरित्रपर पुस्तक आहे. त्यात खाडिलकरांविषयी बरीच टिका आहे. ती वाचून काकासाहेब त्यांचा प्रतिवाद करणे काकासाहेबांच्या वृत्तीमुळे शक्यच नव्हते; पण कोणी आपल्या चाहत्यानेही काही स्पष्टीकरण देऊ नये, असे त्यांनी तातडीने मुंबईला 'नवा काळ 'च्या कचेरीत कळवले. जी व्यक्ती स्पष्टीकरणात्मक लिहील, अशी शंका काकासाहेबांना होती, तिला प्रत्यक्ष भेटीत काकासाहेबांनी खुलासा केला होता. काकासाहेब म्हणाले, 'केसरी'- 'मराठ्या'च्या ट्रस्टींमध्ये मी नाही आणि मी बिनहिशेबी वागणारा आहे, असे दोन मुख्य ओक्षप 'गतगोष्टी'त आहेत. ट्रस्टी होण्यासाठी टिळकांनीच मला विचारले होते, असे त्या पुस्तकातच लिहिले आहे. म्हणजे ट्रस्टी होण्यास मी लायक नाही, असे टिळकांचे मत नव्हते, हे आपोआपच सिद्ध होणारे आहे. बिनहिशोबीपणाचे निराकरण लोकांसमोर 'नवा काळ' ची इमारत आणि छापखाना यांच्या रूपाने ढळढळीत उभे असल्याने केळकरांना वेगळे उत्तर देण्याची गरज नाही. ' 'गतगोष्टी'तील खाडिलकरांवरील निंदेमुळे मामा वरेरकर खूप चिडले, अस्वस्थ झाले. 'या आरोपांचे निराकरण झाले नाही, तर वाचकांचा गैरसमज होईल; इतिहासात चुकीची माहिती राहील.' यावर काकासाहेब शांतपणे म्हणाले होते की, ' ते होणे नाही. या माझ्या खाजगी बाबी आहेत. असल्या क्षुल्लक गोष्टीत जगाचा माझ्याबद्दल गैरसमज झाला, तर माझे काही बिघडत नाही.' यावरून एरव्ही संतापी म्हणून प्रसिद्ध असलेले काकासाहेब आपल्या तत्त्वांविषयी किती शांतपणे आणि विवेकाने आचरण करत, हेही लक्षात येते. काकासाहेबांची आर्थिक स्थिती कधीच फारशी समाधानकारक नव्हती. 'केसरी'त असतानाच्या काळात तर नव्हतीच. पुढे स्वतःचे 'नवा काळ' पत्र काढताना तर आर्थिक अडचणींचे डोंगर उभे होते. अशा वेळी पं० मोतीलाल नेहरूंनी देऊ केलेली दहा हजार रुपयांची मदत त्यांनी नाकारली होती. एका संस्थानिकानेही आपल्या हस्तकाकरवी पाठवलेली मदतही त्यांनी नाकारली होती. सुस्थितीत असताना तत्त्वनिष्ठा जपणे सोपे असते; पण प्रतिकूल परिस्थितीत जपणे कठीण असते. आपल्या अडचणी असूनही दुसऱ्याच्या अडचणीत धावून जाणे, हे तर अधिकच दुर्मीळ असते; पण हरीभाऊ फाटक यांनी १९०८ मध्ये 'राष्ट्रमत' दैनिकाची वाताहत झाल्यानंतर कर्ज फेडण्यासाठी जी पराकाष्ठा केली, त्याला काकासाहेबांनी खूप मोठे सहकार्य केले. प्रथम आपल्या पत्नीचे दागिने दिले. ते हरीभाऊंनी परत केले. अखेर त्यांनी 'राष्ट्रमत' बंद करून छापखाना विकून कर्ज ५४ / नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर