________________
हकिकतही रोमांचकारी आहे. काकासाहेबांना भायखळा तुरुंगातून साबरमतीला नेण्यासाठी ग्रँटरोड स्टेशनवर नेले होते, ते हातात बेड्या अडकवून. कोणाला बेड्या दिसू नयेत म्हणून आपले हात उपरण्यात बांधून ते भर बाराच्या उन्हात एका बाजूच्या बाकावर बसले होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गाडी येऊन गाडीत त्यांना बसवेपर्यंत छायाचित्रकारांसह काही माणसे प्लॅटफॉर्मवर आली. त्यांना नमस्कार करण्यासाठी खिडकीतून हात बाहेर काढीत असतानाच फोटो काढला गेला आणि प्रसिद्धही झाला; मात्र गाडीत बसल्यावर बेड्या काढल्या गेल्या. साबरमतीलाही स्टेशनवर उतरल्यावर पुन्हा बेड्या घातल्या गेल्या; मात्र जेलमध्ये गेल्यावर बेड्या काढल्या गेल्या. पोलिसी हिशेबाने हे सारे नियमानुसार होते. साबरमतीच्या कारागृहात काकासाहेबांना नऊ महिनेच राहावे लागले. सक्तमजुरी नव्हती. काकासाहेबांनी दोरीचे गुंडे करण्याचे हलके काम मागून घेतले होते; मात्र मधुमेह त्रासदायक ठरत होता. आहारही हवा तसा नव्हता; तरी दुधाची सोय खटपटीनंतर झाली. शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रासाने अधिक मनस्ताप झाला. तरी तेवढ्या अवधीत नाट्यलेखन एवढेच मनाजोगते काम होते. 'सावित्री' हे नाटक या अवधीत पूर्ण केले. अंतर्मुख होऊन आध्यात्मिक विचार आणि जन्मभराचे तत्त्वज्ञानाचे चिंतन असल्याने त्यातूनही काकासाहेब सावरले. अखेर १७ जानेवारी १९३० रोजी काकासाहेबांची साबरमतीच्या कारागृहातून मुक्तता झाली. सकाळी त्यांच्या सुटकेच्या वेळेचा अंदाज घेऊन म० गांधी यांनी वाहन पाठवले होते; पण 'अजून वेळ आहे, ' या सबबीखाली तुरुंगाधिकाऱ्यांनी ते परत पाठविले. प्रत्यक्ष जेलच्या बाहेर आल्यावर सामानाच्या ओझ्यासह उन्हात चालणे कष्टप्रद होते; मात्र कैद्यांच्या धान्य पोहचवण्याच्या एका व्यापाऱ्याच्या वाहनातून पाठवण्याची सोय अधिकाऱ्यांनी केली. काकासाहेब म० गांधी यांच्या आश्रमात पोहचले. थोडा आहार घेतला. गांधी यांच्यासोबत पुढील राजकीय धोरणासंबंधी चर्चा केली. 'माझे धोरण मान्य असेल, तर आपल्या पत्रातून त्याचा प्रचार करा,' असे गांधी म्हणाले आणि निरोप घेतला. काही स्थानिक कार्यक्रमातून भाग घेऊन रात्रीच्या गाडीने काकासाहेब निघाले आणि सकाळी मुंबईला पोहचले. स्टेशनपासून त्यांची मिरवणूक 'नवा काळ 'च्या कार्यालयापर्यंत काढली. पुन्हा खाडिलकर घरी आले; मात्र 'नवा काळ ' ची जबाबदारी जी चिरंजीवांवर सोपवली होती, ती कायमचीच ! 'नवा काळ' ची भरभराट होती, त्या काळात कांदेवाडीतील जागा विकत घेऊन 'नवा काळ' च्या मालकीची इमारत काकासाहेबांनी बांधली. एका मराठी वृत्तपत्रीय कार्य : केसरी ४५