Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रतिवादात्मक लिहिण्याची स्वतः टिळकांची इच्छा होती; परंतु त्यांच्या कामाच्या व्यापात ते शक्य झाले नव्हते. दरम्यान खाडिलकरांचे लेख त्यांच्या वाचनात आले होते. त्यामुळे एका अर्थाने खाडिलकरांच्या वृत्तपत्रीय लेखनाची पारख टिळकांनी प्रत्यक्ष भेटीपूर्वीच केली होती. त्या लेखांतील विचारप्रणाली आणि युक्तिवादाची पद्धती टिळकांना भावली होती. म्हणूनच पहिल्याच भेटीत टिळकांनी खाडिलकरांना 'राष्ट्रीय महोत्सवाची आवश्यकता' या विषयावर 'केसरी'साठी लेख लिहिण्यास सांगितले. तो शनिवारचा दिवस होता. घरी आल्याबरोबर अनेक संदर्भ शोधून रविवारच्या दिवसभरात लेख लिहायचा होता; पण रविवार संदर्भ शोधण्यात गेला. सोमवारी सकाळी बैठक मारून लेख पूर्ण केला आणि टिळकांच्या स्वाधीन केला. दुसऱ्याच दिवशी मंगळवारी हा लेख 'केसरी'त प्रसिद्ध झाला. त्यावेळी गणेशोत्सवाला दोन आठवडे उरले होते. पाठोपाठ टिळकांनी आणखी एका लेखाची जबाबदारी सोपवली, 'राष्ट्रीय महोत्सवाच्या वेळी सुशिक्षितांनी काय केले पाहिजे ? ' हा लेखही पाठोपाठ प्रसिद्ध झाला. एका अर्थाने टिळकांना अभिप्रेत सार्वजनिक गणेशोत्सवासाठी लोकमानस तयार करण्यास या लेखांची मदत झाली आणि खाडिलकरांचा 'केसरी'त प्रवेश झाला. २२ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर