________________
होती, स्वतंत्र प्रज्ञा आणि प्रतिभा होती, त्या व्यक्तींचा काळावर स्वतंत्र ठसा उमटल्याखेरीज राहिला नाही. त्या व्यक्ती हे लोकमान्यांचे केवळ अनुयायी नव्हते, तर लोकमान्यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घेऊन आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची मोहोर काळावर उमटवणारी स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे होती. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे असे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होते. म्हणूनच केवळ टिळक प्रभावाखाली ते झाकोळून जाणारे नव्हते. कृ० प्र० खाडिलकर यांच्या कार्यकर्तृत्वाकडे वळण्यापूर्वी त्यांच्या काळाची पार्श्वभूमी थोडी लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत त्याच्या कुवतीचा भाग जसा असतो, तसाच ती व्यक्ती ज्या काळात जन्माला आली, वाढली, ज्या व्यक्तींच्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रभावाखाली आली, त्या सर्वांचा परिणाम तिच्यावर होत असतो. म्हणून खाडिलकरांच्या जडणघडणीच्या काळाची थोडी पार्श्वभूमी समजून घेणे योग्य होईल. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचे कर्तृत्व जरी पुणे-मुंबई अशा मोठ्या शहरांत बहरले असले, तरी कृ० प्र० खाडिलकर आणि सांगली हे समीकरण मराठी मनात पक्के आहे. सांगलीलाही त्यांचा अभिमान आहे; तरी खाडिलकर घराणे हे मूळचे कोकणातले. पेशवाईच्या काळात कोकणातून अनेक ब्राह्मण मंडळी देशावर आली. सांगलीच्या पटवर्धन घराण्याचेही मूळ कोकणातच होते. पटवर्धनांच्या आश्रया- खाली ही बरीच कुटुंबे आली. श्री० कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे वडील प्रभाकर हे प्रथम सांगलीला आले. त्याआधी सांगलीजवळच्या हरिपूर गावात एक खाडिलकर मोकाशी पदावर होते. त्यांचे मदतनीस म्हणून प्रभाकरपंत आले. ही खाडिलकर मंडळी मूळची कोकणातील देवगड तालुक्यातील नारिंग्रे या गावची. सांगलीस पटवर्धनांच्या आश्रयास आल्यावर ती स्थिरस्थावर झाली. प्रभाकरपंतांना हरी आणि कृष्ण हे दोन मुलगे झाले. हरी मोठा. कृष्णाच्या जन्माच्या आधीच दोन महिने प्रभाकरपंत स्वर्गवासी झाले. या मुलाचा पायगुण चांगला नाही, या भावनेने आई आणि आजी या दोघींचाही या तान्ह्या मुलावर राग होता. म्हणून आईने त्याला स्तनपानही दिले नाही; मात्र शेजारीच राहणाऱ्या पटवर्धनांच्या बिऱ्हाडातील गृहलक्ष्मीला दोन महिन्यांपूर्वीच मुलगा झाला होता. तिने मोठ्या आस्थेने आणि ममतेने कृष्णालाही स्तनपान दिले. काही दिवसांनी आईचा आणि आजीचा कृष्णावरचा राग निवळला आणि त्याला मातृसुखही मिळाले. बालपणी प्रथम दुर्लक्ष झाल्याची भरपाई म्हणून की काय, पुढे आईकडून रसाळ शैलीत पुराणकथा ऐकून पुराणकथांची ओढ या मुलाच्या मनात निर्माण १८ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर