________________
शहर पूर्णपणे इंग्रजी भाषेच्या पाशात उतरलेले आहे. कोणत्याच देशी भाषेला स्वतंत्रपणे मिरवण्याची पदवी नाही. मुंबई शहर 'कॉस्मॉपॉलिटन' होऊन चुकले आहे. मोडकेतोडके सटरफटर इंग्रजी येत असले, म्हणजे मग तो चिनी असो, इटालियन असो, सरहद्दीवाला पठाण असो, बंगाली असो किंवा मद्रासी असो, मुंबईस त्याला आपापल्या कर्तबगारीप्रमाणे, एक दिडकीची कोथिंबीर विकत घेण्यास किंवा विकण्यास, दहा-वीस लाखांची मोती खरेदी करण्यास किंवा बाहेरगावी पाठवण्यास आणि पाच-पन्नास लाखांच्या गिरणीचा कारभार थाटण्यास किंवा एकदम बंद पाडण्यास, मराठी किंवा गुजराथी भाषेची क्षणभरही जरूरी लागत नाही. तीस-चाळीस वर्षांपूर्वी देशी भाषांना धाब्यावर बसवणारी म्हणजे 'कॉस्मॉपॉलिटन' मुंबई नव्हती. तीस-चाळीस वर्षांपूर्वी काही काही बाबींतील प्रत्यक्ष अनुभव आज आठवून डोळ्यांपुढे ठेवला आणि आजची मुंबई शहरातील देशी भाषांची गुदमरलेली स्थिती पाहिली म्हणजे नागपूर- वऱ्हाडकडे पळून जावे, असे मुंबईत असताना मनात आल्यावाचून राहात नाही. दोन-चार दिवसांपुरते तरी आपण मला मोकळ्या हवेत येऊ दिले आहे, हा आपला मजवर प्रसादच झालेला आहे. नागपूरचे मराठी विद्यापीठ पुण्यामुंबईच्या बाजूला मराठी युनिव्हर्सिटीच्या गोष्टी कानावर येत असतात. पारिभाषिक शब्दांचा कोश साहित्य परिषदेने तयार करून ठेवला आहे; शास्त्रीय पुस्तके लिहिण्याची कसरत झपाट्याने चालू आहे; टिळक विद्यापीठाने उच्च दर्जाच्या परीक्षेकरता मराठी भाषेत ग्रंथांची कशी तयारी सहज करता येईल, त्याचा स्तुत्य उद्योग गेली दहा-बारा वर्षे फार दक्षतेने केला आहे; मुंबई युनिव्हर्सिटीच्या काही भागांवर मराठी भाषेत लिहिलेल्या पाट्या लावल्याबरोबर एकदम दुसऱ्या क्षणाला पुण्यास मराठी विश्वविद्यालय कसे निर्माण होऊ शकते, याचे मोजमाप घेण्यात आलेले आहे. सर्व तयारी आहे, पण मराठीच्या जेवणाची घंटा काही केल्या तेथे वाजत नाही. हातात दोरी धरून मोठ्या चतुराईने घंटा वाजवण्याचा प्रयत्न झाला; पण अन्न शिल्लक राहिलेले नाही, असा अनुभव आला. युनिव्हर्सिटीच्या दृष्टीने विचार करता आपण नागपूरचे लोक अधिक भाग्यवान आहात आणि दहा-पंधरा वर्षांनी केव्हा तरी पुण्यास मराठी युनिव्हर्सिटी होण्याच्या अगोदर मराठी-हिंदी भाषांची युनिव्हर्सिटी नागपुरास दृष्टीस पडेल आणि हल्लीच्या नागपूरच्या युनिव्हर्सिटीचे स्वतंत्र अस्तित्व नागपुरास दृष्टीस न पडता प्रमुख भाषेचा मान इंग्रजीकडून जाऊन मराठी व हिंदी या दोन देशी भाषांकडे आपोआप येईल, असा अंदाज आहे. मराठी भाषेला उत्तेजन देण्याच्या कामी नागपूरची युनिव्हर्सिटी आज परिशिष्ट - ३ । १३१