हे लक्षात घेतले की, 'मानापमान'कडे आज कथावस्तूपेक्षा सांगीतिक श्रेष्ठत्वाच्या मापानेच मोजले जात आहे; मोजले जावे, असे म्हणावे लागेल. काही असले तरी संगीत नाटककार म्हणून खाडिलकरांना 'मानापमान' नाटकाने नवी वाट, नवी ओळख दिली. ‘सं० मानापमान' नाटकाच्या संदर्भात 'संयुक्त मानापमाना'चा उल्लेख केला नाही, तर हे विवेचन अपूर्ण राहील. १९९० ते १९२० हे मराठी रंगभूमीवरील खास 'बालगंधर्वांचे युग' आहे. याच काळात 'ललितकलादर्श' आणि 'गंधर्व नाटक मंडळी' अशा तुल्यबळ संगीत नाटक मंडळ्यांचे स्वतंत्र चाहते रसिक होते. 'ललितकला ' चे केशवराव भोसले, तर 'गंधर्व ना० मं० ' चे बालगंधर्व हेही तुल्यबळ गायक नट होते. भास्करबुवा बखले हे बालगंधर्वांचे गुरूदैवत, तर रामकृष्णबुवा वझे हे केशवरावांचे गुरू. दोन्ही कंपन्यांची नाटके मुंबईला समोरासमोरच्या नाट्यगृहात हिरिरीने होत; पण त्यात मत्सरग्रस्त स्पर्धा नसून सात्त्विकता होती. मुंबईत त्यावेळी महाराष्ट्रीयांच्या मालकीचे एकही थिएटर नसल्यामुळे असे एक नाट्यगृह बांधावे आणि त्याच्यासाठी केशव (भोसले) आणि नारायण (राजहंस- बालगंधर्व) यांनी एकत्र येऊन 'संयुक्त मानापमाना'चा प्रयोग करावा आणि अर्थनिधी उभा करावा, या कल्पनेला 'संदेश'कार अच्युतराव कोल्हटकर यांनी चालना दिली; पण तेव्हा ती प्रत्यक्षात आली नाही. १९२१ मध्ये म० गांधी यांनी स्वातंत्र्याचा लढा उभारण्यासाठी एक कोटी रूपयांचा ‘टिळक फंड' उभारण्याचा संकल्प सोडला होता. त्यामुळे 'केशव- नारायणांच्या संयुक्त 'मानापमान' कल्पनेला राष्ट्रभक्तीचे अधिष्ठान मिळून ती प्रत्यक्षात आली. लोकमान्यांबद्दल बालगंधर्वांना पराकोटीचा आदर होता. 'बालगंधर्व' हे बिरूदही त्यांना लोकमान्यांचीच दिले होते. - दिनांक ८ जुलै १९२१ रोजी हा संयुक्त 'मानापमाना'चा प्रयोग ग्रँटरोडवरील बालीवाला ग्रँड थिएटरमध्ये झाला. पात्रयोजना अशी भामिनी (बालगंधर्व), धैर्यधर (केशवराव भोसले), लक्ष्मीधर (गणपतराव बोडस), विलासधर (माधवराव वालावलकर), कुसुम (नानासाहेब चापेकर) आणि अक्कासाहेब ( मास्टर कृष्णराव). तिकिटाचे दर होते, १००, ५०, २५, १०, ५ रुपये! पहिल्या चाळीस मिनिटांत सर्व तिकीट विक्री झाली. त्या दिवशीचे उत्पन्न १६ हजार ८०० रुपयांवर गेले. हा तेव्हा उच्चांक होता. पुढे दीर्घकाळ या प्रयोगाची आणि केशव नारायणांच्या सरसतेबद्दलच्या मतमतांतरांची चर्चा चालू होती. अर्थात, धैर्यधराच्या पदांच्या चालीच आक्रमक, चढ्या सुराला अनुकूल होत्याच. नाटककार खाडिलकर १११
पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/११४
Appearance