दाखविली असून, प्रतिष्ठितांच्या करारी बाण्याचा आधारस्तंभ नाहीसा होताच समाज अप्रतिष्ठित कसा होतो, हे निदर्शनास आणण्याकरिता विश्वामित्राच्या- सभोवारच्या काशीनगरीच्या बिघडलेल्या परिवेष्टनाची अर्थात दिवाळखोर रत्नपाल नटवी सुवर्णदासी, खोटे जमाखर्च लिहिणारा चित्रगुप्त, दलाली करणारा बच्चंभट वगैरे उपहासात्मक पात्रांची योजना केली आहे. ' या प्रास्ताविकाने नाटकासंबंधीच्या अपेक्षा उंचावतात, हे खरे आहे. आजपर्यंतच्या या कथेवरील अन्य नाटकांपेक्षा आता विशेष काय मिळते, याची उत्सुकता लागते; परंतु प्रत्यक्षात मात्र अपेक्षाभंग होतो. सत्त्वनिष्ठ राजा हरिश्चंद्राचा करारी बाणा आणि त्याच्या पार्श्वभूमीवर असा बाणा ज्यांचा नाहीसा झाला आहे, अशी रत्नपाल, सुवर्णदासी, बच्चंभट, चित्रगुप्त ही पात्रे यांच्या कथेतून नाटककार आपले प्रमेय नाट्यबद्ध करू पाहत आहे; परंतु हरिश्चंद्र, तारामती, रोहिदास आणि विश्वामित्र ह्या पुराणकथेतील व्यक्तिरेखांबरोबरच चित्रगुप्त, सुवर्णदासी आदी काल्पनिक पात्रांची सृष्टी खाडिलकर नेहमीच्या पद्धतीने करतात. ती सगळीच पात्रे अत्यंत क्षुद्र, हास्यास्पद, मूर्ख आणि घृणास्पद बनतात. करारी बाण्याचा आदर्श नसलेली पात्रे धरबंद सोडून धूर्त आणि बनेल बनतात. तसे येथे होत नाही. ही पात्रे हास्यही निर्माण करीत नाहीत. स्वतः मात्र हास्यास्पद बनतात. एकपरीने ती तिटकाऱ्याला पात्र होतात. ही पात्रे जर दुष्ट, मतलबी, स्वार्थी, कपटी दाखवली असती, तर त्यांच्यामुळे समाजाचा होणारा अधःपात अस्वस्थ करून गेला असता आणि हरिश्चंद्रादी पात्रांची योग्यता आणि उंची प्रकर्षाने जाणवली असती; परंतु तसे होत नाही. उलट इतक्या खुज्या माणसांच्या प्रभावळीतील हरिश्चंद्र स्वतःच खुजा होऊन जातो. खाडिलकरांची गौण पात्रे मुख्य पात्रांची उंची नेहमीच कमी करतात. येथेही तेच होते, विशेषत्वाने होते. त्यामुळे हरिश्चंद्रादींचा छळही त्यांच्याविषयी सहानुभूती, करूणा वा उदात्तता निर्माण करीत नाही... त्यांचा छळ करणारा विश्वामित्र त्यांचा छळ का करतो ? त्यालाही काही सबळ तात्त्विक बैठक नाही. 'कीचकवधा'तील कीचकाला सुद्धा त्याची म्हणून एक तात्त्विक बाजू आहे. येथे विश्वामित्राला तीही नाही. तो आक्रस्ताळा वाटतो. खाडिलकरांच्या नाटकांतून प्रतिपक्ष अनेकदा आक्रस्ताळा वाटतो, असतो. त्याचा एक दुष्परिणाम असा होतो की, नायक-नायिकांचे कर्तृत्व तेवढ्या प्रमाणात पुढे उणावते. प्रतिपक्ष जेवढा प्रबळ, तेवढे नायक-नायिकांचे बळ, त्यांची प्रतिमा उंचावते. नाही तर मूर्ख वा आक्रस्ताळ्यांपुढे पराभूत होणारे अधिक दुबळे ठरतात किंवा जिंकले, तरी तो विजय फारसा स्पृहणीय राहात नाही. विश्वामित्राचे नाटकभर नाटककार खाडिलकर ९९
पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/१०२
Appearance