पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिक्षण आणि शाश्वत विकास


 जगात शाश्वत असे काही नसते. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलत असतात. पण माणूस जेव्हा भविष्याचा विचार करतो, तेव्हा 'शाश्वत' घटक महत्त्वाचा ठरतो. संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) एकविसाव्या शतकाचा विचार करून नियोजन, विचारविमर्श करायला प्रारंभ केला तेव्हा त्याच्या लक्षात आलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी होती की विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात माणसाने निसर्गाची अपरिमित हानी केली असून निसर्ग नाशाचा हा क्रम भविष्यात असाच चालू राहिला तर जगाला फार मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल. हवामानातील बदल, अनियिमित पाऊसमान व तपमान, संपत चाललेली खनिज संपत्ती, पाण्याची उधळपट्टी, जंगलतोड, प्रदूषण, असमान विकास, प्रगतीचा असमतोल हे असे काही मुद्दे होते की जगाने त्यावर विचार करून त्वरित हस्तक्षेप करण्याचे धोरण ठरविण्यात आले. त्यानुसार जगभर शिक्षणाचे एक धोरण असावे तरच अपेक्षित बदल, विकास साधता येईल यावर जगाचे एकमत होऊन सन १९८५ च्या दरम्यान 'शाश्वत विकासासाठी शिक्षण' (Education For Sustainable Development) (ESD) असे सूत्र निश्चित करून त्यानुसार शिक्षणाचा विकास पट तयार करण्याचे ठरविण्यात आले.
 'शाश्वत विकासासाठी शिक्षण' हा शिक्षणविषयक असा एक दृष्टिकोन आहे की ज्याच्याद्वारे आपणास मनुष्यास त्याच्या भविष्यविषयक जबाबदारीची जाणीव निर्माण करून देऊन ती पेलण्याची क्षमता त्याच्यात निर्माण करणे शक्य होईल. त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९८७ ते २००२ असा सलग पंधरा वर्षे विचार करून २००५ साली 'Learning the Treasure within' नावाचा एक अहवाल युरोपियन कमिशनच्या साहाय्याने

नवे शिक्षण, नवे शिक्षक/९६