पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाला. नवी पिढी फक्त मिळकत जाणते. मूल्य त्यांच्या लेखी पोट भरल्यावरच्या गप्पा. जीवनाबद्दलच्या संकल्पनाच बदलल्यामुळे शिक्षण बदलणं अपरिहार्य होऊन गेले आहे. वाचन, लेखन, टंकन, संवाद, श्रवण, संशोधन, नव संकल्पना, गणित, विज्ञान, मल्टिमिडिया, मूल्य, नैतिकता, संस्कृती, इतिहास, पर्यावरण हे नव शिक्षणाचे घटक बनत चालले आहेत, विषय नव्हे.
 नवे शिक्षण चिकित्सक वृत्ती विकसित करणारे असले पाहिजे, तद्वतच ते समस्या सोडविण्यास साहाय्यभूत कौशल्ये विकसित करणारे असले पाहिजे. शिक्षणात माहिती, तंत्रज्ञानाच्या जोडीने नव्या ज्ञाननिर्मितीवर भर हवा. विद्यार्थी ग्रहणक्षम असण्यावर भर हवा. पाठांतरापेक्षा आकलन महत्त्वाचे व्हायला हवे. मौखिक व लिखित भाषा कौशल्य हवे. ज्ञान संपादनाची साधने व संपादन कौशल्य देण्यावर भर हवा. खडू-फळा (Chalk and Talk) नको, जोडा नि ओढा (Plug and Chug) असे नवे तंत्र हवे. जिज्ञासा व कल्पनांची स्वैरता जोपासणारे शिक्षण हवे. वेळापत्रकापेक्षा विद्यार्थ्यांना काय मिळाले, कळाले महत्त्वाचे व्हायला हवे. स्मरणापेक्षा समजण्याला महत्त्व हवे. पाठ्यपुस्तक साधन बनायला हवे, साध्य नको. शिक्षण कृतिशील, रचनात्मक हवे, मौखिक नको दृकश्राव्य हवे. मूल्यमापन कसोटीचे आकलन हवे. शिक्षक न्यायाधीश नाही, साहाय्यक, मार्गदर्शक हवा. पाठ्यक्रम दरवर्षी नवा हवा.
 खडू, फळा, तक्ते, मॉडेल्सची जागा फिल्म, व्हिडिओ, कॅसेटस्, त्रिमिती, चौमिती फिती, मल्टिमिडिया यांनी घ्यायला हवी. शालेय प्रशासन पारदर्शी होण्यासाठी शाळा व घर जोडणारे नेटवर्क हवे. घरी बसून पाल्याला काय येते, न येते, तो काय करतो, न करतो समजायला हवे. विद्यार्थी जीपीएसवर हवा. क्लोज टीव्ही सर्किटवर शाळा हवी, प्रत्येक तासाचे रेकॉर्डिंग हवे. चुकलेला अभ्यास भरून काढण्यासाठी चुकलेल्या तासाच्या कॅसेटस्, ग्रंथालयात उपलब्ध हव्यात. ग्रंथालयात पुस्तके नकोत, ई-साधने (ई-बुक्स, कॅसेटस्, सीडीज, फिल्मस) हवीत, वही नको, लॅपटॉप हवेत. घरी एक, शाळेत एक. दोन्ही ऑनलाइनने जोडलेले, रिकाम्या हाताने जायचे, डोके भरून यायचे म्हणजे शिक्षण.
 शिक्षणात पालक सहभाग महत्त्वाचा. पालक शिक्षित होईल तसे शिक्षण गतिमान होणार. शिक्षक रोज नवा हवा. नवज्ञान संपन्न. औपचारिक पात्रतेपेक्षा कौशल्य वृत्ती, व्यासंग महत्त्वाचा. शिक्षण व्यवसाय नाही, प्रवृत्ती आहे, प्रक्रिया आहे. ती नित्यनूतन व परिवर्तनशीलच हवी. मुले

नवे शिक्षण, नवे शिक्षक/९३