पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/79

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१) मूलभूत अभ्यासक्रम (Core Course) २) अध्यापन पद्धती/शास्त्र (Pedagogy) 3) शिक्षक जाणिवांचा विकास (Developing Teacher Sensibility ) पहिल्या घटकात शिक्षणाची मूलभूत तत्वे, विद्यार्थी व अध्ययन प्रक्रिया (Learner and Learning), विद्यार्थ्यांचे सामाजीकरण, शालेयकरण व स्वभाव, अध्ययन-अध्यापन संबंध, अभ्यासक्रम, भारतीय शिक्षणाचे परिप्रेक्ष्य व दृष्टी इत्यादीद्वारे नव्या माध्यमिक शिक्षकाचा शिक्षणविषय दृष्टिकोन विकसित करण्यावर भर राहणार आहे. दुसरा घटक अध्यापन पद्धतीचा असून त्याअंतर्गत प्रशिक्षक वा विद्यार्थी-शिक्षक जो अध्यापनाचे शालेय विषय (School Subject/Method) निवडील त्याच्या अध्यापन तंत्राचे त्याला प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. विषय ज्ञान, अंतशाखीय अध्यापन पद्धती, मूल्यमापन शिक्षकाचे स्वत:चे शिकणे (निरंतरता) अशा नव्या बाबींवर भर देण्यात आल्याने भविष्यात शालेय अध्यापनात आमूलाग्र बदल होईल असे वाटते. तिसरा घटक नव बदलातील महत्वाचा मुद्दा आहे. शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व व अध्यापन समृद्धी(Enrichment), भाषा प्रावीण्य (Proficiency), माहिती व संपर्क साधन तंत्रज्ञानाचा अध्यापनात कुशल वापर, शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य (विद्यार्थी व शिक्षक दोघांचे - खरे तर परस्परपूरकता!) कला व सौंदर्यदृष्टी विकास, विविध ज्ञानसाधनांचा वापर (प्रयोगशाळा, ग्रंथालय, शैक्षणिक साधने) यांना प्रशिक्षणात विशेष महत्त्व राहणार आहे. शिवाय लिंगभेदातीतता, शांतता, पर्यावरण जागृती, विशेष विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्याची तत्परता (अंध, मतिमंद, गतिमंद, मूक-बधिर, वंचित इ.) वर्गात प्रसंगोपात संबोधन (जयंती, स्मृतिदिन, विशेष घटना इ. अनुषंगाने) याद्वारे शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व संवेदनशील, समाजशील व समाज सहभागात सक्रिय राहील यावर प्रशिक्षणात भर दिला जाणार आहे. दुसऱ्या वर्षात वरील घटकांचा उत्तरार्ध अपेक्षित आहे. असे प्रशिक्षण मिळेल तर शाळेतले कंटाळवाणे अध्यापन संपले असे म्हणायला वाव आहे.

 भारतातील पूर्वप्राथमिक ते विद्यापीठ स्तरापर्यंतच्या विद्यमान शिक्षक, त्यांचे शिकणे, शिकवणे, चित्र-चारित्र्य, आचार-विचार, समाजमनातील शिक्षकाची ढासळती प्रतिमा या सर्व पार्श्वभूमीवर नव बदलांना महत्त्व असून ते अनिवार्य आहेत. प्रश्न असा आहे की वर्तमान विषम व्यवस्थेत शिक्षक स्वत:ची ऊर्जा नि वृत्ती टिकवून धरत शिकवत राहणार का? आजच्या शिक्षकांपुढे खरे आव्हान प्रयोगशील स्वातंत्र्याचे आहे. वर्तमान व्यवस्थेत त्यास वाव नाही, म्हणून शिक्षक किती दिवस चाकोरीत पाट्या

नवे शिक्षण, नवे शिक्षक/७८