पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/73

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बूट, टाय घालू लागली, रिक्षा, बसमधून जाऊ लागली, इंग्रजी शिकू लागली, शाळा स्पार्टेक झाल्या. शिक्षक व शिक्षण स्मार्ट झाले नाही. भौतिक संपन्नता शिक्षण नव्हे.
 माहितीचे रूपांतरण ज्ञानात होऊन ते जीवन जगण्याचे साधन व जीवन दृष्टी करणारे होणे म्हणजे शिक्षण. यांचा आपणास विसर पडला आहे. जन सामान्यांकडे आलेल्या गरजेपेक्षा अधिक पैशाने एक चंगळवादी संस्कृती निर्माण केली. मॉल्स, मल्टिप्लेक्सच्या धर्तीवर शाळा मल्टिमीडिया युक्त झाल्या, पण गरीब समाज शिक्षण वंचित राहण्याचे नवे दुष्टचक्र शिक्षणाच्या खासगीकरणाने जन्माला घातले. शिक्षण समृद्ध हवे, तसे ते सर्वांना समान प्रवेश व विकासाची संधी देणारे राहील, तरच समाज सर्वंकष समृद्ध होणार ना? जागतिकीकरणाच्या रेट्यात आपण राष्ट्रीय शिक्षणाचा ध्येयवाद व मूल्यवाद हरवून बसलो आहोत. आपली मुले आपण एटीएम मशिन्स बनवत आहोत. आपणास संस्कारशील, नीतिमान, जबाबदार नागरिक हवे असतील तर न्याय्य नागरी समाज निर्माण करणारे शिक्षण द्यायला हवे. आपण कमावती पिढी घडवून सामाजिक आत्महत्या करत आहोत. अर्थसंपन्नेतेने माणसाचा कांचनमृगच झाला नाही, तर क्रौंचवधही झाला आहे.
 शिक्षणाच्या पुनर्रचनेचे आव्हान
 जागतिकीकरण, माहिती व तंत्रज्ञानातील क्रांती, उदार अर्थनीती, मुक्त व्यापार यातून आपल्या समाजजीवनात व जीवनशैलीत गतीने बदल होऊन आपण भौतिक समृद्धी म्हणजे जीवन असे चंगळवादी तत्त्वज्ञान आत्मसात केले. माहितीचा स्फोट झाला, संपर्क साधने जनसामान्यांच्या हाती आली, पण माहितीचे रूपांतर ज्ञानात करण्याची प्रगल्भता आपण निर्माण केली नाही. चॅनल्सच्या महापुरात आपण माहिती, ज्ञान व मनोरंजन एकाच वेळी दिले. पण ज्ञान निवडीची बौद्धिकता दिली नाही. लोकशाही अधिकार दिले, पण मताचा विवेक व विधिनिषेध आपण रुजवला नाही. परिणामी आपल्या देशात आर्थिक समृद्धी वाढूनही बौद्धिक दारिद्र्य दूर झाले नाही. धर्मांधता, जातीयवाद, दैववाद आपण कमी करू शकलो नाही. नागरी जीवनात मूल्यनिष्ठ व्यवहाराची मुळे (Roots) आपणास निर्माण करता आली नाहीत. मोबाईल दिला, पण इंटलेक्च्युअल मोबिलिटी आपण विकसित केली नाही.
 हे दूर करायचे असेल तर शिक्षणाच्या पुनर्रचनेस पर्याय नाही. आपणास जग बदलाची आव्हाने कवेत घ्यायची आहेत, पण सर्वांना समान शिक्षण

नवे शिक्षण, नवे शिक्षक/७२